केडगाव पोलीस चौकीत ‘हप्त्यांचा बाजार’; खाकी वर्दीच्या आडोशाने तक्रारींचे ‘मॅनेजमेंट’!?


कलानगर (दापोडी) परिसरातील अवैध धंद्यांना ऊत; मध्यस्थांचा सुळसुळाट, तक्रारदारच होतोय ‘टार्गेट’?
आवाज लोकशाहीचा (विजय चव्हाण)
ज्या खाकी वर्दीवर सर्वसामान्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे, तीच वर्दी आज केडगाव पोलीस चौकीच्या परिसरात संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. केडगाव पोलीस चौकीच्या कारभारावर सध्या गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, अवैध आर्थिक स्रोत गोळा करण्यासाठी एक समांतर ‘यंत्रणा’ उभी केल्याची चर्चा कलानगर (दापोडी) परिसरात जोर धरत आहे. येथे “तक्रार म्हणजे न्याय नव्हे तर व्यवहार” अशी धक्कादायक परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

चौकीत थेट तक्रार करण्याऐवजी ‘मध्यस्थ’ मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले आहेत. एखादी तक्रार आली की संबंधित व्यक्तीला गाठून तक्रारीचे स्वरूप वाढवून सांगणे, अटकेची भीती घालणे आणि त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये ‘बैठक’ घडवून आणणे — या प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असल्याचे बोलले जाते. “दोघेही कोर्टात जाल, त्यापेक्षा इथेच मिटवा” असा दम देऊन शेवटी समेटाच्या नावाखाली आर्थिक फायदा उचलला जात आहे.
कलानगर परिसरात खुलेआम दारू विक्री आणि हातभट्टीचे अड्डे सुरू आहेत. कोरोना काळात सुरू झालेला आठवडे बाजार आजही पद्धतशीरपणे सुरू असून, त्याठिकाणी कष्टकरी कामगारांच्या गरजांचा फायदा घेत अवैध व्यवसायांना खतपाणी घातले जात आहे. विशेष म्हणजे, रबर-प्लास्टिक जाळणारे पुरवठादार आणि भेसळयुक्त गुळाचे कारखाने यांच्यावर कारवाई करण्याऐवजी महिन्याची ‘ठरलेली रक्कम’ वसूल करण्याकडेच यंत्रणेचा कल असल्याची टीका होत आहे.

पोलीस दलात तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवणे अपेक्षित असताना, येथे मात्र तक्रार करणाऱ्याचे नावच थेट आरोपीला सांगितले जाते. परिणामी तक्रारदार आणि गुन्हेगार यांच्यात थेट संघर्ष निर्माण होऊन तक्रारदारालाच जीविताची भीती निर्माण होते. “तुमचे तुम्हीच पाहून घ्या” असा सल्ला पोलिसांकडून मिळत असल्याने नागरिक आता तक्रार देण्यासही धजावत नाहीत.

पुणे-सोलापूर महामार्गावर रात्री होणाऱ्या चोऱ्या, गांजा विक्री आणि देहविक्री यांसारख्या गंभीर गुन्ह्यांना चौकीतून अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. नंदीवाला, वैद्य आणि देवळा समाजातील अंतर्गत वादांतही जातपंचायतीच्या नावाखाली भीती दाखवून कायद्याचा धाक दाखवत पैशांची उकळपट्टी केली जात आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आणि चर्चा असताना वरिष्ठ पोलीस अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत की त्यांचे या कारभाराला मूक समर्थन आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. केडगाव पोलीस चौकीतील या कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी दापोडी आणि कलानगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.

“केडगाव पोलीस चौकीत सामान्यांना न्याय मिळण्याऐवजी भीतीच जास्त दाखवली जाते. अवैध धंद्यांवर कारवाई करण्याऐवजी फक्त वसुलीवर भर दिला जात आहे. वरिष्ठांनी याची दखल न घेतल्यास जनआंदोलन छेडले जाईल.”
– त्रस्त नागरिक, कलानगर परिसर.