दौंड च्या भीमा सहकारी साखर कारखान्यात ‘बदला’चे वारे; निराणी ग्रुप गाशा गुंडाळण्याच्या तयारीत?

आवाज लोकशाहीचा…
विशेष वृत्…विजय चव्हाण
……………………………………………………………………………..


पाटस ते दिल्लीपर्यंत चर्चांना उधाण | नव्या ‘ग्रुप’कडून कारखाना स्थळाची पाहणी | सभासदांमध्ये संभ्रमावस्था
……………..,………………………………………………………………


तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कामधेनु मानल्या जाणाऱ्या ‘भीमा सहकारी साखर कारखान्या’ बाबत सध्या एकच खळबळजनक चर्चा रंगली आहे. २५ वर्षांच्या करारावर हा कारखाना चालवण्यास घेतलेला ‘निराणी ग्रुप’ (साईप्रिया) आता कारखाना सोडण्याच्या तयारीत असल्याची चिन्हे दिसत आहेत. या संदर्भातील भाकीत पाटस पासून थेट दिल्लीच्या राजकीय वर्तुळा पर्यंत पोहोचले असून, आगामी गळीत हंगाम निराणी ग्रुप करणार नाही, अशी ठाम भविष्यवाणी सहकारातील जाणकारांकडून केली जात आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कारखान्याची प्रतिमा मलिन झालेली आहे
गेल्या काही महिन्यांपासून भीमा कारखान्याच्या कारभारावरून तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. विविध प्रकरणांतून समोर आलेले भ्रष्टाचाराचे विषय आणि आर्थिक अनियमिततेचे आरोप यामुळे कारखान्याची पत धोक्यात आली आहे. याच दबावाखाली आणि अंतर्गत अडचणींमुळे निराणी ग्रुप आता या करारातून बाहेर पडणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

निराणी ग्रुप जाणार हे आता केवळ औपचारिक उरले असल्याचे बोलले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे, एका नामवंत साखर कारखानदार ग्रुपच्या शिष्टमंडळाने नुकतीच कारखान्याला भेट देऊन संपूर्ण मशिनरी आणि परिसराची पाहणी केली आहे. ‘ठरलं तर मग’ या धर्तीवर सर्व व्यवहार अंतिम टप्प्यात असून, केवळ ताबा घेण्याची प्रक्रिया शिल्लक असल्याचे समजते. यामुळे २५ वर्षांचा करार अवघ्या दोन वर्षांतच संपुष्टात येणार का? असा सवाल ऊस उत्पादक विचारत आहेत.

स्वर्गीय मधुकाका शितोळे यांनी ज्या विश्वासाने आणि निष्ठेने हा कारखाना उभा केला, त्या कारखान्याची आजची दुर्दशा पाहून जुने सभासद हळहळ व्यक्त करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असताना कारखान्याचे संचालक मंडळ मात्र ‘नाही ऐकले, नाही पाहिले’ अशा भूमिकेत आहे. प्रसारमाध्यमांना अधिकृत माहिती देण्याऐवजी साध्या कागदावर विना स्वाक्षरीची माहिती देऊन वेळ मारून नेली जात असल्याचा आरोप स्थानिक पत्रकारांनी केला आहे.

कारखान्याच्या ढासळत्या स्थितीवर प्रश्न उपस्थित केले की, नेतृत्वाचे भक्तगण सोशल मीडियावर सक्रिय होतात. सत्याला बगल देऊन शब्दांचा खेळ करत विरोधकांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. आपल्या नेत्याची प्रतिमा मलीन होऊ नये यासाठी हे भक्तगण प्रयत्नशील असले तरी, सामान्य सभासद मात्र आता वस्तुस्थिती जाणून घेण्यास उत्सुक आहे.

निराणी ग्रुप जाणार की राहणार, या प्रश्नाचे उत्तर आगामी गळीत हंगाम सुरू होईपर्यंत गुलदस्त्यातच राहण्याची शक्यता आहे. जर साईप्रिया ग्रुपने हंगाम सुरू केला नाही, तर संचालक मंडळाने सभासदांपासून मोठी माहिती लपवली असल्याचा ठपका त्यांच्यावर बसणार हे निश्चित. राजकारणाच्या गडद ढगांमुळे सत्य दडपले जात असले तरी, शेतकऱ्यांच्या हिताचा हा कारखाना नेमका कोणाच्या घशात जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.