आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण
दौंड : राज्यात कॅप्टन अशोक राऊत प्रकरणामुळे बुवा-बाबांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच दौंड तालुक्यातही अशाच प्रकारच्या तथाकथित महाराजांचे जाळे वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. विविध आश्रम, मठ आणि दरबारांच्या माध्यमातून भाविकांना आकर्षित करून त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
तालुक्यातील पाटस, केडगाव, कुसेगाव, पडवी, माळवाडी या भागांमध्ये काही महाराजांनी मोठ्या प्रमाणावर आपले प्रस्थ निर्माण केले आहे. दारू व्यसनमुक्ती, अपत्यप्राप्ती, भूतबाधा निवारण, आर्थिक अडचणी दूर करण्याचे आश्वासन देत भाविकांना आकर्षित केले जात असल्याचे सांगितले जाते. “आशीर्वादाने सर्व प्रश्न सुटतात” असा दावा करत अनेकांना आपल्या दरबारात खेचले जात आहे.
या महाराजांच्या भोवती काही अंधश्रद्धाळू अनुयायी तयार झाले असून ते विविध “चमत्कारांच्या कथा” सांगून इतरांना प्रभावित करत आहेत. परिणामी, भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सुरुवातीला छोट्या ठिकाणी कार्यरत असलेले हे महाराज आता मोठे मठ, आश्रम आणि आर्थिक व्यवहार उभे करत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, कॅप्टन राऊत प्रकरणानंतर राज्यभर सुरू झालेल्या चर्चेमुळे दौंड तालुक्यातील काही महाराज आणि त्यांच्या अनुयायांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. काही ठिकाणी हालचाली कमी झाल्याचेही नागरिक सांगत आहेत.
या पार्श्वभूमीवर या बाबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. काही राजकीय व प्रशासकीय व्यक्तींशी संबंध असल्याची चर्चा असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
संत परंपरेचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरी वाढत असल्याबाबत समाजातील जाणकारांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्या विचारांवर आधारित विवेकवादी परंपरेला धक्का बसत असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



