आवाज लोकशाहीचा
यवत | प्रतिनिधी
यवत पोलिसांनी घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत मोठी कारवाई करत सात घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास दौंड तालुक्यातील वाखारी गावातील एका घरात अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे १ लाख २६ हजार ६७२ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०५, ३३१(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सीसीटीव्ही फुटेज व गुप्त खबऱ्याच्या मदतीने पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांनी अमर दशरथ चव्हाण (वय ३२, रा. हिवरा, ता. शिरूर, जि. पुणे) याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
तपासादरम्यान त्याचे साथीदार
महेश संभाजी भोसले (वय २२, रा. गुंडेगाव, जि. अहमदनगर)
आणि
अमोल शास्त्री भोसले (वय २०, रा. हिवरा, ता. शिरूर, जि. पुणे)
यांना देखील अटक करण्यात आली.
पोलिस तपासात आरोपींनी यवत पोलीस ठाणे हद्दीत ६ ठिकाणी आणि उरुळी कांचन पोलीस ठाणे हद्दीत ३ ठिकाणी घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली असून एकूण १० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
चोरीचा मुद्देमाल आरोपींनी अहमदनगर येथील सराफ दुकानदाराकडे विक्री केल्याचेही तपासात उघड झाले असून त्या दुकानदारालाही पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, मुख्य आरोपी अमर चव्हाण याच्यावर यापूर्वीही घरफोडी, दरोडा व जबरी चोरीचे गुन्हे दाखल असून तो विविध पोलिस ठाण्यांमध्ये वॉन्टेड होता. ब्रह्मगाव पोलीस स्टेशन (जि. सातारा) व शिरूर पोलीस स्टेशन येथेही त्याच्यावर कारवाई झालेली आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव ढमढरे यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख व त्यांच्या पथकाने केली.



