सत्य लपवलं जाते ?आणि याला जबादार नक्की कोण!
आवाज लोकशाहीचा | भिगवण प्रतिनिधी
भिगवन येथील तरुणी अपहरण प्रकरणाने आता सरळ गुन्हेगारीच्या चौकटीतून बाहेर पडत राजकीय आणि पोलिसीय गोंधळाचं रूप घेतलं आहे. रोज नवी माहिती पुढे येते, नवे चेहरे समोर येतात, नवे दावे-प्रतिदावे होतात… पण ठोस सत्य मात्र अद्यापही धूसरच! आहे
सुरुवात झाली ती अत्यंत धक्कादायक घटनेने — तरुणीला पळवताना तिच्या आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकल्याच्या आरोपाने. संपूर्ण परिसर संतप्त झाला होता. पण काही दिवसांतच कथानकाला कलाटणी मिळाली. संबंधित तरुणीने “मी स्वखुशीने गेले” असा जबाब दिला. त्यानंतर नोटरी सर्टिफिकेट, व्हिडिओ शूट, प्रसार माध्यमांसमोर सादरीकरण — या सर्व हालचालींनी संशय अधिकच गडद केला आहे.
रात्रीच्या वेळी अचानक बारामती पोलीस स्टेशनमध्ये मुलीची हजेरी, त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया आणि सुधारगृहात रवानगी — या घडामोडींनी प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं केलंआहे
दरम्यान हिंदू संघटनांचा उद्रेक झाला. आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी उघडपणे हस्तक्षेप केला. भिगवनमध्ये आक्रोश मोर्चा सुद्धा निघाला.
या सर्व प्रक्रियेत दौंडचे आमदार राहुल कुल यांचे नाव समोर आले. कुल यांनी पत्रकार परिषद घेऊन “माझा संबंध नाही” अशी भूमिका घेतली होती, मात्र सोशल मीडियावर त्यांना जबरदस्त ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आरोपी कुटुंबीयां सोबतचे फोटो-व्हिडिओ व्हायरल करून कुल यांना सरळसरळ खोटे ठरवण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला आहे.
यानंतर स्वामी चिंचोलीचे माजी सरपंच अजहर शेख यांच्यावर संशयाची सुई वळली. तो राहुल कुल यांचा निकटवर्तीय कार्यकर्ता असल्याच्या चर्चा रंगल्या. “अजहरला अटक झाली” असा सोशल मीडियावर प्रचार मोठ्या प्रमाणात झाला.
पण खरी धक्कादायक बाब पुढे आली —
भिगवन पोलीस म्हणतात, “अजहर आमच्याकडे अटकेत नाही.”
दौंड पोलीस म्हणतात, “आम्हाला माहिती नाही.”
मग प्रश्न सरळ आहे —
अजहर शेख नेमका आहे कुठे?
अटक झाली की नाही? झाली असेल तर कोणी केली?
की पोलिसच या प्रश्नाला बगल देत आहेत?
या संपूर्ण गोंधळात सर्वाधिक झळ बसली ती त्या तरुणीला आणि तिच्या कुटुंबाला. तिच्या आयुष्याची झालेली कलाटणी, आई-भावाच्या मनावरचा आघात — याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न यातून पुढे आला आहे .
घटनाक्रम पाहता, मुलगी कथित आरोपीच्या घराजवळ राहत होती. मग “अपहरण” हा शब्द कसा आणि का उद्भवला? हा मुद्दा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उचलून धरला. त्यांनी थेट दौंडच्या आमदारांचा फोटो प्रसारमाध्यमांसमोर दाखवत गंभीर प्रश्न उपस्थित केले.
परिणामी, प्रकरणात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खरं-खोटं काय आहे, हे फक्त पोलिसांना ठाऊक. पण पोलिस मात्र स्पष्ट माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये शंका-कुशंका वाढत आहेत.
या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न असा आहे —
पोलीस दबावाखाली आहेत का?
असतील तर दबाव टाकणारी शक्ती कोण?
राजकीय हस्तक्षेप आहे का? की कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय ?
भिगवन ते बारामती, दौंड ते पुणे — या एका प्रकरणाने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही मोठा तिढा निर्माण केला आहे.
जर पोलिसांनी पारदर्शक आणि ठोस भूमिका घेतली नाही, तर हा संशयाचा वणवा अधिकच भडकणार आहे.
अपहरण प्रकरण की राजकीय संरक्षणाचा खेळ?
सत्य बाहेर येईपर्यंत हा प्रश्न अनुत्तरितच राहणार असले तरी सत्य लपवलं जाते ?आणि याला जबाबदार कोण हा प्रश्न सुटला पाहिजे



