भिगवण अपहरण प्रकरणाला वेगळे वळण; ‘मी मर्जीने आले’ म्हणत मुलीचा व्हिडिओ व्हायरल, तर हिंदू जनआक्रोश मोर्चातून पालकांचा जबरदस्तीचा आरोप,

आवाज लोकशाहीचा..
भिगवण: (प्रतिनिधी)
भिगवण येथील २१ वर्षीय तरुणीच्या अपहरण प्रकरणाने आता नाट्यमय वळण घेतले आहे. ‘माझे अपहरण झाले नसून मी माझ्या मर्जीने आले आहे,’ असा दावा करणारा व्हिडिओ संबंधित तरुणीने सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. मात्र, हा व्हिडिओ दबावाखाली आणि जबरदस्तीने बनवण्यात आल्याचा आरोप करत, सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या ‘जनआक्रोश मोर्चा’त आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली.
नेमकी घटना काय?
मंगळवार, दि. १७ रोजी संबंधित तरुणी आपल्या आई आणि भावासोबत खरेदी करून दुचाकीवरून घराकडे जात असताना, भररस्त्यात आई-भावाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून तिचे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी भिगवण पोलिसांनी अझर शेख आणि आयान शेख (रा. स्वामी चिंचोली, दौंड) या दोन सख्ख्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भिगवणमध्ये तीव्र पडसाद
घटनेचे गांभीर्य ओळखून बुधवारी भिगवण बंदची हाक देण्यात आली होती, ज्याला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. तणावपूर्ण वातावरण पाहता शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आक्रोश मोर्चा आणि राजकीय नेत्यांचा इशारा
बुधवारी सायंकाळी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना नेत्यांनी स्पष्ट केले की:
प्रसारित झालेला व्हिडिओ हा तरुणीकडून जबरदस्तीने बनवून घेण्यात आला आहे.
मुलीला लवकरात लवकर नराधमांच्या तावडीतून सोडवून तिच्या पालकांच्या स्वाधीन करावे.
या प्रकरणात राजकारण न करता हिंदू मुलींचे संरक्षण होणे गरजेचे आहे.
शिवजयंतीपर्यंत मुलीचा शोध न लागल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
पोलिसांसमोर मोठे आव्हान
घटनेला दोन दिवस उलटूनही पोलीस आरोपींपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. पोलिसांनी तपास चक्रे फिरवली असून सहा पथके रवाना केली आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री संतप्त ग्रामस्थांनी पुणे-सोलापूर महामार्गावर ठिय्या मांडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. अद्याप मुलगी आणि आरोपींचा पत्ता लागलेला नसून संपूर्ण तालुक्यात चिंतेचे आणि संतापाचे वातावरण आहे.