आवाज लोकशाहीचा
वरवंड प्रतिनिधी…………
आवाज़ लोकशाही’चा दणका
पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवंड हद्दीतील एका सीएनजी पंपावर केडगावच्या कोतवालाने आज सकाळी भररस्त्यात ‘खाकी’ची नसली तरी ‘पदाची’ जी हुकूमशाही दाखवली, त्यावरून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. “मी काय तहसीलदार आहे का?” अशा आविर्भावात वागणाऱ्या या कोतवालाच्या दहशतीमुळे सामान्य कर्मचारी आणि वाहनचालक हैराण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साधारण पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास केडगाव गावचे कोतवाल आपल्या चारचाकी गाडीतून महामार्गावर उलट्या दिशेने (रॉन्ग साईड) सीएनजी पंपावर आले. त्यावेळी गॅस भरण्यासाठी आधीच रांग लागलेली होती. नियमांचे उल्लंघन करूनही या कोतवालाने आपली गाडी रांगेतील पहिल्या गाडीसमोर आडवी लावली आणि “मला ड्युटीवर जायला उशीर झाला आहे, आधी माझ्या गाडीत गॅस भरा,” अशी दमबाजी सुरू केली.
पंपावरील कर्मचाऱ्याने नियमाप्रमाणे रांगेत येण्याची विनंती केली असता, संबंधित कोतवालाने मोठ्या आवाजात ओरडत कर्मचाऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. “गाडी हलवणार नाही, काय करायचे ते करा,” अशा धमक्या देत या ‘भाऊसाहेबांनी’ पंपावर मोठा गोंधळ घातला. या प्रकारामुळे साधारण अर्धा तास पंपावरील सेवा विस्कळीत झाली होती, ज्यामुळे इतर वाहनचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
‘आवाज़ लोकशाही’च्या प्रतिनिधीला पाहताच पळ काढला
या तांडवाच्या दरम्यान ‘आवाज़ लोकशाही’चे प्रतिनिधी विजय चव्हाण त्या ठिकाणी पोहोचले. सर्व प्रकार पाहून त्यांनी कोतवालाच्या गाडीचे फोटो काढण्यास सुरुवात केली. आपला प्रताप कॅमेऱ्यात कैद होत असल्याचे लक्षात येताच, मघाशी रुबाब दाखवणाऱ्या कोतवालाने गॅस न भरताच गाडी काढली आणि दौंडच्या दिशेने भरधाव वेगाने पळ काढला.
एक सामान्य कोतवाल असतानाही आलिशान चारचाकी गाडीतून फिरणे आणि दाखवलेला तोरा पाहता, या कोतवालाची आर्थिक परिस्थिती नेमकी कशी सुधारली? हा महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा नमुना तर नाही ना? असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.
“स्वतःला तहसीलदार समजणाऱ्या अशा मुजोर कर्मचाऱ्याची तात्काळ चौकशी करून त्याला सेवेतून बडतर्फ करावे, जेणेकरून प्रशासनाची प्रतिमा मलिन होणार नाही.”
या प्रकरणाची दखल आता वरिष्ठ महसूल अधिकारी घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



