आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण
निकालाआधीच टांगणीला जीव; कार्यकर्ते कोमात, उमेदवार दुविधेत
मतदानाच्या पेटीत बंद झालेल्या मतांवर आता विजय-पराजयाची मोहर उमटणार आहे. पण निकालाच्या आधीच तालुक्यातील राजकीय वातावरण ताणाच्या टोकावर पोहोचले आहे. आठवडाभर जोरदार प्रचार करणारे उमेदवार सध्या दुविधा मनःस्थितीत आहेत. “विजय आपलाच” असा वरवरचा आत्मविश्वास दाखवला जात असला, तरी अंतर्मनात भीतीचे सावट स्पष्ट दिसत आहे.
उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे, तर कार्यकर्ते जणू कोमात गेल्यासारखे शांत झाले आहेत. प्रचाराच्या काळात खाण्या-पिण्याची सोय व्यवस्थित झालेली कार्यकर्त्यांची फौज आता “पुढे काय?” या प्रश्नात अडकली आहे. काही जण गावठीच्या आधारावर तात्पुरती शांतता शोधताना दिसतात.
“साहेब, विजय आपलाच… पण पन्नास द्या!”
कालपर्यंत घराघरांत माहितीपत्रक वाटणारा, डोक्यावर पक्षाची टोपी आणि गळ्यात चिन्हाचा पंचा मिरवणारा कार्यकर्ता आज हात जोडून “साहेब, पन्नास द्या” अशी विनंती करताना दिसतो. प्रचारातील दिखावा आणि निकालानंतरची वस्तुस्थिती यातील फरक प्रचंड आहे.
राजकारणात कोणाचा जय, कोणाचा पराजय होईल हे उद्या स्पष्ट होईल; मात्र गावात निर्माण होणाऱ्या भांडण-तंट्यांचे धनी कोण असतील, याची चाहूल आतापासूनच लागली आहे.
निष्ठावंतांची माती
तालुक्यात काही कार्यकर्त्यांची “निष्ठावंत” अशी ओळख होती. पण नेत्यांनी अचानक पक्षांतर केल्याने हेच निष्ठावंत आज मातेरे झाले आहेत. घरकुलं, नातीगोती आणि राजकीय समीकरणे यामध्ये त्यांची अवस्था “घर का, घाट का नाही” अशी झाली आहे.
एकूण सात गट आणि १४ गणांची निवडणूक पार पडली आहे. राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी या निवडणुकीत लक्ष वेधले आहे. विशेषतः तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील एक गट आणि पूर्व पट्ट्यातील एक गट यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कडवी टक्कर
विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या विरोधात माजी आमदार रमेश थोरात यांचे दोन महत्त्वाचे पॅनल कडवे प्रतिस्पर्धी म्हणून उभे आहेत. इतर पक्षांचे संपूर्ण पॅनल नसून काही ठिकाणी उमेदवार, काही ठिकाणी अपेक्षांची लढत आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिकच चुरशीची ठरली आहे.
उद्या सकाळपासून दौंड येथे मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निकाल कोणाच्या बाजूने लागणार, यावरून नेते आणि कार्यकर्त्यांची डोकेदुखी वाढली आहे.
मतदान संपले, प्रचार थांबला; पण ताण शिगेला पोहोचला आहे. उद्याचा निकाल केवळ जागांचा हिशोब ठरवणार नाही, तर तालुक्यातील पुढील राजकीय दिशा निश्चित करणार आहे.



