आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण
वाळकी गावात शेलार यांचा जल्लोषात सत्कार; राहू बेटात राजकीय समीकरणांना धक्का?
राहू-खामगाव गणातील जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान मतदानाच्या दिवशी वाळकी गावात अनपेक्षित राजकीय घडामोड पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार सागर शेलार यांचे काही स्थानिक कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत करत सक्रिय पाठिंब्याचा संदेश दिला. या घटनेने राहू बेटातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
साधारण साडेबारा वाजण्याच्या सुमारास शेलार वाळकी येथे दाखल झाले. मतदान केंद्रांच्या व्यवस्थापन प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी ते विविध केंद्रांना भेटी देत असताना मित्रपरिवाराने त्यांचे उसाचा रस देऊन स्वागत केले. हास्यविनोद आणि चर्चा विनंयाने काही काळ गावात उत्साही वातावरण निर्माण झाले. स्वागतावेळी काढण्यात आलेले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय चर्चेला उधाण आले.
विशेष म्हणजे राहू बेट हा विद्यमान आमदार राहुल कुल यांचा बालेकिल्ला मानला जातो. कुल हे भारतीय जनता पार्टीचे आमदार असून या भागात त्यांचे संघटन मजबूत समजले जाते. अशा परिस्थितीत वाळकीसारख्या गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला उघडपणे मिळालेला पाठिंबा हा सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
वाळकीतील हा एकरूप झालेला गट मतदानाच्या दिवशी पहिल्यांदाच इतक्या ठळकपणे पुढे आला. या स्वागत समारंभातून स्थानिक पातळीवरील नाराजीचा सूर उमटत असल्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. सत्ताधारी आमदारांच्या कार्यप्रणालीबाबत काही गावांमध्ये असंतोष असल्याचे संकेत या घटनेतून मिळत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या जल्लोषाचा मतदानाच्या निकालावर किती परिणाम होणार, हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. तरीही वाळकीत उमटलेला हा राजकीय संदेश राहू-खामगाव गणातील समीकरणे बदलण्याची चिन्हे देत आहे. शेलार यांना येथे लक्षणीय मताधिक्य मिळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचेही लक्ष आता या गावाकडे लागले आहे.



