कुरकुंभ औद्योगिक पट्ट्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट?बेकायदेशीर व्यापाराचे जाळे पसरल्याची जोरदार चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.

आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण
कुरकुंभ औद्योगिक पट्ट्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट?
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; नागरिकांचा उघड आक्रोश
दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक पट्टा सध्या अवैध धंदे, रासायनिक तस्करी आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांमुळे चर्चेत आला आहे. कुरकुंभ, पांढरेवाडी, मळद, खडकी, रावणगाव या परिसरात बेकायदेशीर व्यापाराचे जाळे पसरल्याची जोरदार चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.
औद्योगिकीकरणाच्या नावाखाली निर्माण झालेल्या या पट्ट्यात काही राजकीय आशीर्वाद लाभलेल्या घटकांच्या छत्रछायेखाली मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. विशेष म्हणजे, दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार सुरू असतानाही कारवाई का होत नाही? असा थेट सवाल गावकरी उपस्थित करत आहेत.
पोलिसांवर थेट आरोप होतो आहे ?
कुरकुंभ पोलीस चौकीतील एका कर्मचाऱ्यावरच अवैध धंद्यांना पाठबळ दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही समाज बांधवांना जवळ करून, राजकीय संबंधांचा आधार घेत, चौकीचा कारभार ‘निवडक’ पद्धतीने चालवला जात असल्याची चर्चा उघडपणे होत आहे.
तक्रारी केल्या तर उलट खोटे गुन्हे दाखल होण्याची भीती असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक गप्प बसत असल्याचे चित्र आहे. “धंदे डोळ्यासमोर सुरू आहेत, पण बोलायची हिंमत होत नाही,” असे नागरिक टक्केवारीने सांगत आहेत.
परप्रांतीयांवर कारवाई, स्थानिक मात्र सुरक्षित?
औद्योगिक परिसरात परप्रांतीय कामगारांच्या माध्यमातून काही अवैध धंदे सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र पोलिसांची कारवाई झालीच, तर मूळ स्थानिक सूत्रधार बाजूला राहतात आणि केवळ परप्रांतीयांवर गुन्हे दाखल होतात, असा आरोप केला जात आहे. हा दुहेरी मापदंड का? असा सवालही उपस्थित होत आहे.
रासायनिक तस्करीचा भूतकाळ, वर्तमानातही सावट?
कुरकुंभ हा रासायनिक उद्योगांसाठी ओळखला जाणारा पट्टा. काही वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या मादक रासायनिक तस्करी प्रकरणानंतरही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही, अशी चर्चा आहे. छोट्या-मोठ्या स्वरूपात आजही संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे नागरिक सांगतात.
“हा परिसर सर्वसामान्यांच्या रोजगारासाठी नसून, राजकीय आशीर्वाद लाभलेल्या घटकांच्या आर्थिक उलाढालीसाठी बाजारपेठ बनला आहे काय?” असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आहे.
ठेकेदारी, राजकारण आणि आर्थिक साखळी?
औद्योगिक क्षेत्रातील काही ठेकेदार स्वतःला मातब्बर उद्योजक म्हणून मिरवत असले तरी, त्यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत शंका उपस्थित होत आहेत. स्थानिकांना हाताशी धरून आर्थिक लाभ उचलणे, वाद निर्माण झाल्यास त्यांनाच पुढे करणे, आणि स्वतः मात्र सुरक्षित राहणे—अशी कार्यपद्धती असल्याची तक्रार आहे.
काही गावठी राजकीय शिलेदारांच्या स्नेहसंबंधातून ही साखळी अधिक मजबूत झाल्याचे नागरिक सांगतात. लाखो रुपयांची ‘माया’ गोळा करून ती आपापसात वाटली जाते, अशीही चर्चा आहे.
प्रसारमाध्यमांनाही दबाव?
या विषयावर आवाज उठवणाऱ्या प्रसारमाध्यमांची बदनामी करण्याचे डावपेच आखले जात असल्याचा आरोपही पुढे येतो आहे. “आवाज उठवला तर बदनाम करायचं” ही पद्धत वापरली जात असल्याची भीती पत्रकारांमध्ये व्यक्त होत आहे.
प्रशासनाने आता जागे व्हावे!
कुरकुंभ औद्योगिक पट्टा हा राज्याच्या औद्योगिक विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र जर या विकासाच्या आड अवैध धंद्यांचे जाळे विणले जात असेल, तर त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि संबंधित तपास यंत्रणांनी या आरोपांची गांभीर्याने दखल घेऊन पारदर्शक चौकशी करावी, हीच नागरिकांची मागणी आहे.
अन्यथा “औद्योगिकीकरणाच्या नावाखाली तस्करीचे साम्राज्य” अशी ओळख या भागाला लागू नये, याची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न आज दौंड तालुक्यातील जनतेसमोर उभा आहे.