आवाज लोकशाहीचा | विजय चव्हाण
राहू बेटावर राष्ट्रवादीचे शक्तीप्रदर्शन
६९८ कोटींच्या रस्त्यावर बसून विकासाचे ढोंग, चौकात मुतारीही नाही – कडाडून हल्लाबोल
राहू बेटाच्या मध्य चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावरील उमेदवारांचा प्रचार शुभारंभ म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या तथाकथित विकासावर थेट हल्ला चढवण्याचा जाहीरनामा ठरला.
“ज्या रस्त्यावर तुम्ही बसले आहात त्या रस्त्यावर तब्बल ६९८ कोटींपेक्षा अधिक निधी खर्च झालाय. पण माझ्या गावात साधी मुतारीसुद्धा उभी राहिली नाही. हा कसला विकास?”
अशा शब्दांत सत्ताधाऱ्यांच्या कारभाराची चिरफाड यावेळी करण्यात आली.
वाळकी फाट्यापासून शंभू महादेवाच्या दर्शनासाठी हलगीच्या कडकडाटात पदयात्रा, शिवछत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादन आणि नंतर झालेल्या सभेत राजकीय वातावरण चांगलंच तापलं.
‘विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक’
माजी आमदार रमेश थोरात, महेश भागवत, वैशाली नागवडे, ज्योती झुरूंगे, कैलास गाढवे, संभाजी कुदळे, शांताराम बांदल, सखाराम शिंदे, अँड यशवंत शिंदे यांच्यासह पंचायत समिती उमेदवार श्रेया शिंदे व जिल्हा परिषद उमेदवार सागर शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषद उमेदवार सागर शेलार यांनी मिरवडी गावातील शाश्वत विकासाचा दाखला देत
“खरा विकास कागदावर नसतो, तो जमिनीवर दिसतो. गावाचं नाव देशपातळीवर पोहोचवायचं असेल तर काम बोलायला हवं”
असं ठणकावून सांगितलं.
अँड यशवंत शिंदे यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका करत सांगितलं –
“आधी २० कोटी, मग अष्टविनायक नावाखाली २६९ कोटी आणि आता लोहगाव-राहू-यवत-पारगाव ४०९ कोटींचा रस्ता. म्हणजे तुम्ही बसलेला हा रस्ता ६०० कोटींच्या वरचा आहे. पण गावकऱ्यांना लघवीसाठी जागा नाही. अशा रस्त्यावर बसताना रस्त्यावरील कपाळाला माती लावा म्हणजे विकास दिसेल!”
इतकंच नाही तर,
“भांडणं लावणं, कुटुंबं उध्वस्त करणं आणि दहशत निर्माण करणं हाच तुमचा विकास आहे”
असा थेट आरोपही त्यांनी केला, पण आता झाकली मूठ सव्वा लाखाची यापुढे दबाव तंत्राचा वापर करू नका सर्वांनी एकोप्याने राहून आपल्या परिसराचा विकास साधावा, असा इशारा देत राहू गावातील दबाव तंत्रावर त्यांनी थेट बोट ठेवलं.
‘मुतारीही नाही हे दुर्दैव’
माजी सरपंच कैलास अण्णा गाढवे म्हणाले –
“मी सरपंच असताना शाळा, ग्रामपंचायत इमारत, गाळे बांधले. पण आजही छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुतारी नाही, हे लाजिरवाणं आणि दुर्दैवी आहे. पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत.”
दबाव तंत्राला छेद
दिवसा दबावामुळे शांत असलेले नागरिक रात्रीच्या अंधारात मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
दुकानांतून, कोपऱ्यांतून सगळं ऐकत असलेले मतदार म्हणजे दबाव तंत्राला मिळालेला ठळक छेद होता.



