दौंडमध्ये कायद्याला कोयत्याचा धाक? – पोलिसांच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा रोष

आवाज लोकशाहीचा | विजय चव्हाण
दौंड शहरात सध्या एकच खळबळजनक प्रश्न चर्चेत आहे — “गुन्हेगारीला कुणाचा आशीर्वाद आहे?”परिणामी.कायद्याला कोयत्याचा धाक आहे?
कारण १२ जानेवारी रोजी दुपारी साधारण तीनच्या सुमारास, नगरपालिका ते पोलीस स्टेशन समोरील संविधान चौका सारख्या गजबजलेल्या परिसरात, कोयत्या सारखे प्राणघातक हत्यार घेऊन एका व्यक्तीवर चार चौघांनी हल्ला केला. हा प्रकार पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर घडतो, आणि तरीही त्यावर “आपापसात मिटले” असा शिक्का मारला जातो — ही बाब धक्कादायक आणि संशयास्पद आहे.
शहरभर सीसी टीव्हीचे जाळे आहे. त्याचे थेट निरीक्षण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात २४ तास सुरू असते. मग दिवसा ढवळ्या हत्यारां सह मारहाण होत असताना पोलिसांना ते का दिसत नाही?
की दिसूनही ‘दिसत नाही’ असा देखावा केला जातो?
इथेच नागरिकांचा संताप उसळतो. कारण एरव्ही साध्या तक्रारींसाठी नागरिकांना पोलिस ठाण्याच्या उंबरठ्यावर ताटकळत ठेवले जाते, पण या गंभीर प्रकरणात तक्रारच नाही, प्रकरण मिटले — हा खुलासा पोलीसच देतात. मग प्रश्न उभा राहतो:
कायद्याचं नियंत्रण पोलिसांकडे आहे की कुणा अदृश्य शक्ती कडे?
या घटनेनंतर शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. व्यापारी वर्ग, ग्राहक, नागरिक — सर्वांमध्ये भीती आहे. बाजारपेठेवर याचा थेट परिणाम दिसतो आहे.
कायदा-सुव्यवस्था टिकवणं जर अपयशी ठरत असेल, तर पोलीस यंत्रणेचं औचित्य काय?
दौंड मधील नागरिक आता दबक्या आवाजात नाही तर उघडपणे पोलिस कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. सोशल मीडियावर आणि चौकाचौकात पोलिसांना ट्रोल केलं जातंय — कारण गुन्हेगारांना मोकळं रान आणि सामान्यांना असुरक्षितता हे चित्र तयार झालं आहे.
ही केवळ एक घटना नाही — हा प्रशासनाच्या ढिसाळ पणाचा आरसा आहे.
पोलीस बांधवांनी आता तरी स्वतःचा कारभार आरशात पाहावा. अन्यथा दौंड मध्ये कायदा नव्हे, दहशत राज्य करेल — आणि त्याची जबाबदारी कोणत्याही ‘आपापसात मिटलेल्या’ कथनाने पुसता येणार नाही