आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण
निवडणूक आली… आणि लाचारीची यात्रा सुरू झाली!
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले, की काहींना “मीच उमेदवार” असल्याची स्वप्न पडू लागतात, तर काहींना तर थेट “मी निवडणूक जिंकलेलीच आहे” असा भास होऊ लागतो. याच भ्रमातून सुरू होते यात्रा–दर्शन, पिकनिक, सत्कार, हार–तुरे आणि नेत्यांच्या मागे लाचारपणे घिरट्या घालणारी टोळी.
ही लोकशाही आहे की लाचारीची स्पर्धा?
हा प्रश्न आज मतदारांनी स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.
आज सामाजिक काम, प्रामाणिकपणा, पारदर्शकता या शब्दांना कुणीही विचारत नाही. निवडणूक तिकीट मिळवण्यासाठी नेत्यांच्या दारात उभे राहणारे, मान खाली घालून होकार देणारे आणि पुढे जाऊन काटपुतळी बनणारे इच्छुक उमेदवार आज तालुक्यात विनोदाचा विषय ठरत आहेत. स्वतःची भूमिका नाही, स्वाभिमान नाही, आणि जनतेशी नातंही नाही—फक्त नेत्यांची हजेरी आणि भक्तांची फौज!
महिला काळात झालेल्या निवडणुकांमधून नेमके कोणते नागरिकांचे प्रश्न सुटले?
पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण यातील उणीवा भरून निघाल्या का?
की फक्त सत्तेचा मेवा, निधींची लूट आणि पुढील निवडणुकीची तयारी एवढाच अजेंडा राहिला?
आवाज लोकशाहीचा या माध्यमातून दौंड तालुक्यातील तथाकथित “सामाजिक निधी” कसा सेवाकार्याच्या नावाखाली लुटला जातो, याची कागदोपत्री माहिती आम्ही लवकरच जनतेसमोर आणणार आहोत. इच्छुक उमेदवार आणि माजी पदाधिकारी यांना वरिष्ठ राजकारण कसे गुलाम बनवते, त्यांचे स्वातंत्र्य कसे हिरावून घेते आणि त्यांना फक्त आदेश पाळणारी बाहुली कसे करते—हेही उघड होणार आहे.
तालुक्यात विकासाचा डांगोरा पिटणाऱ्यांचाच पितळ उघड होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. आणि जर हे आरोप खोटे असतील, तर संबंधितांनी खुलासा करण्याचे धाडस दाखवावे—पळ काढू नये, मौन बाळगू नये.
शासनाचे पैसे, जनतेचा निधी—हे स्वतःचे उपकार असल्यासारखे मिरवायचे, भक्तांच्या माध्यमातून प्रचार करायचा आणि मागून भ्रष्ट कारभारातून लूट करायची ही जुनीच खेळी आता उघडी पडणार आहे.
ज्यांच्याकडे पुरावे आहेत, कागदपत्रे आहेत, शंका आहेत—त्यांनी आवाज लोकशाहीचा शी संपर्क साधावा. सत्य प्रसिद्ध करण्याची जबाबदारी आम्ही उचलतो.
आणि जर नेता, कार्यकर्ता, भक्त या सगळ्यांनी या आरोपांवर शांतता पाळली, तर मतदारांनी समजून घ्यावे—इथे काहीतरी नक्कीच काळेबेरे आहे.
अशा वेळी उमेदवाराला प्रश्न विचारा, खुलासा मागा. उत्तर पटले नाही, तर सरळ विचारा—
“लोकांसाठी काहीच केलं नाही, मग उमेदवारी कशासाठी?”
हे आवाहन चुकीचे नाही, कारण हा कुणाचा वैयक्तिक आवाज नाही—
हा लोकांचा आवाज आहे.
आवाज लोकशाहीचा…



