दौंड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी दुर्गा ताई – विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात

आवाज लोकशाहीचा
✍️ विजय चव्हाण
दौंड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी दुर्गा ताई – विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात
दौंड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच नगराध्यक्ष दुर्गा ताई यांच्या खांद्यावर शहराच्या भविष्याची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. आजपर्यंत झालेल्या विकासापेक्षा अधिक लक्षवेधी, दूरदृष्टीपूर्ण आणि शाश्वत विकासाचा ढाचा पुढील पाच वर्षांत उभा करणे हेच त्यांच्या नेतृत्वाचे खरे कसब ठरणार आहे.
आर्किटेक्चरचे शिक्षण, नियोजनाची दृष्टी आणि आधुनिक डिझाइनची जाण या कौशल्यांच्या बळावर दुर्गा ताईंना शहरासाठी सर्वांगीण विकास आराखडा तयार करावा लागणार आहे. हा आराखडा राबवताना काहींच्या हितसंबंधांना धक्का बसू शकतो, काही अल्पसंतुष्ट आत्मे अडथळे निर्माण करू शकतात. अशा वेळी कणखर निर्णयक्षमता, सहनशीलता आणि सद्विवेक बुद्धी यांची कसोटी लागणार हे निश्चित आहे.
शहरात आजवर झालेल्या विकासकामांचा दर्जा, त्यावर झालेला खर्च आणि अपूर्ण राहिलेल्या प्रकल्पांची वस्तुस्थिती प्रसारमाध्यमांतून थेट मतदारांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. अन्यथा मागील अर्धवट कामांचा व भ्रष्ट कारभाराचा भार नकळत नव्या नेतृत्वावर येण्याचा धोका नाकारता येणार नाही.
नगरविकास करताना सर्व नगरसेवकांना विश्वासात घेणे आवश्यक असले तरी, नाहक विरोध करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्ती जनतेसमोर उघड करण्याची जबाबदारीही नगराध्यक्षांवर आहे. अन्यथा विकासकामांत अडथळे आणि सततचा त्रास शहराच्या प्रगतीला खीळ घालू शकतो.
दौंड शहरासमोर आज पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालये, नियोजित पार्किंग, नाले–गटारी स्वच्छता आणि कचऱ्याचा ज्वलंत प्रश्न हे मोठे यक्षप्रश्न उभे आहेत. हे प्रश्न केवळ आश्वासनांनी नव्हे, तर ठोस कृतीने सोडवावे लागणार आहेत.
पाच वर्षांचा कार्यकाळ हा विरोधक–समर्थकांच्या गणितात अडकण्यासाठी नसून, सर्वाधिक मते देणाऱ्या दौंडकरांना केंद्रबिंदू मानून विकास करण्याचा हा काळ आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.
पालिकेच्या कारभारात काही कानफुकी अधिकारी आणि चुगलीखोर घटक असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. सर्व कर्मचारी दोषी नाहीत; मात्र जे नागरिकांच्या हिताचे काम अडवतात, स्वतःच्या महत्त्वासाठी यंत्रणा ठप्प करतात, अशांवर कठोर कारवाई करणे ही काळाची गरज आहे. येथे दुर्गा ताईंनी दुर्गा देवीचा अवतार घेऊन चुकीच्या प्रवृत्तींना आरसा दाखवावा, अशी अपेक्षा दौंडकर व्यक्त करत आहेत.
आज दौंडच्या मतदारांनी पूर्ण शहरातून विश्वास देत दुर्गा ताईंना निवडून दिले आहे. एक महिला सक्षमपणे नागरी विकास घडवू शकते, हे दाखवून देण्याची ही सुवर्णसंधी आहे. जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासातील नेतृत्वाची प्रेरणा घेऊन दौंड शहराचा नवा चेहरा–मोहरा उभा राहील, अशी अपेक्षा व्यक्त करणे वावगे ठरणार नाही.
दौंडच्या इतिहासात हा कार्यकाळ विकासाचा मैलाचा दगड ठरो, हीच दौंडकरांची अपेक्षा.