आवाज लोकशाहीचा | विजय चव्हाण
४०९ कोटींचा रस्ता शोध मोहिमेत असतानाच
तालुक्यात रस्त्यांच्या नावाखाली महा भ्रष्टाचाराचा पर्दाफाश होऊ लागला आहे
लोहगाव–राहू–यवत–पारगाव हा ४०९ कोटी ४० लाख रुपयांचा अंदाज पत्रकीय रस्ता सध्या प्रत्यक्षात कुठे आहे, झाला आहे की होणार आहे, की फक्त कागदावरच अस्तित्वात आहे—याचा शोध नागरिकांना घ्यावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रस्त्यांची प्रत्यक्ष स्थिती पाहता तालुक्यात रस्ते कामांमधून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचे आता ठोसपणे सिद्ध होऊ लागले आहे.
फक्त पश्चिम पट्ट्यातील राहू किंवा पूर्व पट्ट्यातील मलठण एवढ्या पुरते हे प्रकरण मर्यादित नाही. मध्य पट्ट्यातील वाखारी–गजला फार्म–खोर रस्ता, तसेच डाळिंब येथील गायकवाड वस्तीतील मुख्यमंत्री सडक योजनेचा रस्ता यांची दयनीय अवस्था पाहिली, तर रस्ते विकासाच्या नावाखाली प्रचंड आर्थिक लूटच सुरू आहे, असा निष्कर्ष निघतो.
तालुक्यात १६३२ कोटी रुपयांहून अधिक निधी रस्ते व पूल कामांसाठी खर्च केल्याचा दावा विविध माध्यमांतून करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात या निधीतून झालेली कामे निकृष्ट दर्जाची, अपूर्ण आणि धुळीच्या साम्राज्यात अडकलेली दिसत आहेत. कोट्यवधींचा निधी आणि त्यातून तयार झालेले रस्ते—हा फरकच भ्रष्टाचाराचा जिवंत पुरावा ठरत आहे.
राहू परिसरातून जाणारा कथित ४०९ कोटींचा लोहगाव–यवत–पारगाव रस्ता नेमका कुठून जाणार, आधीच कोट्यवधी खर्चून तयार झालेल्या वाघोली–राहू–पारगाव रस्त्या वरूनच पुन्हा नवा रस्ता दाखवला जाणार का, असे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एकाच रस्त्यावर पुन्हा-पुन्हा निधी मंजूर करण्याचा ‘प्रताप’ फक्त याच तालुक्यात घडतोय का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
पुणे–सोलापूर महामार्गावरून वाखारी हद्दीतून गजला फार्म मार्गे खोरकडे गेलेला मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्ता कागदोपत्री डांबरीकरण झाल्याचे दाखवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात आज या रस्त्यावर धूळ, उघडी खडी आणि अपघातांचा धोका दिसतो. कोट्यवधींच्या निधीचा हा ‘उत्कृष्ट भ्रष्टाचार नमुना’ असल्याचे नागरिक उघडपणे बोलू लागले आहेत.
डाळिंब येथील गायकवाड वस्तीतील रस्ता आजही माती, फुपाटे आणि त्रासदायक स्थितीत आहे. तर मलठण पुनर्वसन येवले वस्ती ते जगताप घर–मलठण रोड या १४ लाख रुपयांच्या रस्त्याचे काम पाहता अधिकारी नेमके काय करतात, ठेकेदाराने काय केले, याचा मागोवा घ्यावा लागतो. हा रस्ता म्हणजे राज्यपातळीवर दाखवावा असा भ्रष्ट कारभाराचा नमुना ठरत आहे.
गेल्या १५ वर्षांपासून तालुक्यात रस्त्यांमधून भ्रष्टाचार करून आर्थिक सुबत्ता कमवण्याची स्पर्धा सुरू आहे की काय, असा सवाल आता उघडपणे उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधी गप्प, अधिकारी वर्षानुवर्षे खुर्चीला चिकटलेले, आणि कालचा कार्यकर्ता आज ठेकेदार बनून वातानुकूल गाडीत ‘जिंदाबाद’च्या घोषणा देताना दिसतो—हे चित्र या तालुक्याने पाहिले आहे.
संघटित ठेकेदारी, काही कर्तबगार अधिकारी आणि राजकीय आशीर्वाद यांच्या संगन मतातून रस्ते निकृष्ट केले जात असून शासनाचा महाकाय निधी राजरोसपणे गडप केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. हे सर्व दिसत असूनही नागरिक श्रद्धा आणि निष्ठेच्या नावाखाली या खड्ड्यांतून प्रवास करत टाळ्या वाजवत आहेत, हीच या व्यवस्थेची सर्वात मोठी शोकांतिका आहे.
शासनाच्या कोट्यवधींच्या निधीतून निकृष्ट कामे करून पैसा गायब करण्याचा हा ‘अनोखा कार्यक्रम’ आता उघड होत आहे.



