बारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई खंडणीखोर टोळीचा तिसराही आरोपी गजाआड; ‘बारामतीचा डॉन’ बनून उद्योजकाची लूट,





आवाज लोकशाहीचा

धमक्या, मारहाण, व्हिडिओ शूट करून दहशत; ८५ हजारांची खंडणी उकळणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

बारामती, दि. १९ :
स्वतःला ‘बारामतीचा डॉन’ असल्याची खोटी बतावणी करत एका उद्योजकाला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळाच्या गर्तेत ढकलणाऱ्या खंडणीखोर टोळीतील फरार असलेला तिसराही आरोपी अखेर बारामती तालुका पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. न्यायालयाने या आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला चांगलाच हादरा बसला आहे.

कटफळ (ता. बारामती) येथील अवजारे तयार करणाऱ्या एका उद्योजकाकडून निरज रॉय, शुभम मोरे आणि भूषण रणसिंगे या तिघांनी ऑक्टोबर २०२४ पासून संघटित पद्धतीने खंडणी उकळण्याचा धंदा सुरू केला होता. “आम्ही बारामतीचे डॉन आहोत” असे सांगत या आरोपींनी फिर्यादीला वारंवार धमकावत ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात पैसे उकळले.

आरोपींनी फिर्यादीस बारामतीतील विविध हॉटेलमध्ये बोलावून जबरदस्तीने दारूचे बिल भरायला लावले. एप्रिल २०२५ पासून तर त्यांनी थेट धमकीची भाषा वापरत,
“कंपनी चालवायची असेल तर दरमहा पैसे द्यावे लागतील, नाहीतर बारामतीत राहू देणार नाही” असे स्पष्टपणे सांगितले.

कधी ४ हजार, कधी १० हजार रुपयांच्या हप्त्यांत खंडणी वसूल करत आरोपींनी उद्योजकावर दहशत निर्माण केली. ऑक्टोबर २०२५ मध्ये पेन्सिल चौक परिसरात फिर्यादीस अडवून “दारूचे बिल भर, नाहीतर हातपाय मोडीन” अशी धमकी देत मारहाण करण्यात आली. एवढ्यावर न थांबता, वंजारवाडी परिसरात २० हजार रुपये ऑनलाईन मागवून धमकीखाली व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.

१८ ऑक्टोबर रोजी रात्री अमरदीप हॉटेल येथे १३ हजार रुपयांची मागणी करत पुन्हा मारहाणीचा प्रयत्न करण्यात आला. संपूर्ण कालावधीत आरोपींनी एकूण ८५ हजार रुपयांहून अधिक रक्कम उकळली असून, पैसे न दिल्यास जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत बारामती तालुका पोलिसांनी फरार असलेल्या तिसऱ्या आरोपीस एमआयडीसी परिसरातून अटक केली. पुढील तपास सुरू असून, अशा गुन्हेगारी प्रवृत्तींचा समूळ नायनाट केला जाईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.

ही धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह  गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुक्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, तसेच धनश्री भगत, मनोज पवार, राजू बन्ने, ओंकार भोसले, भारतीय खंडागळे, रेणुका पवार यांच्या पथकाने केली.