४०९ कोटी ४० लाखांचा रस्त्यासाठी? निधी देणारे कार्यालय कुठे, अधिकारी कोण? तुला माहीत आहे? एकच प्रश्न

आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण…

दौंड तालुक्यात तब्बल ४०९ कोटी ४० लाख रुपयांच्या रस्त्याचा फलक झळकल्या नंतर नागरिकांमध्ये उत्साह नव्हे तर संशयाची आग पेटली आहे. एवढ्या महाकाय निधीचा उल्लेख प्रथमच फलकावर दिसल्यानंतर प्रश्न उभा राहतोय तो एकच हा निधी देणारे कार्यालय नेमके कुठे आहे? आणि त्याचा जबाबदार अधिकारी कोण?

हा रस्ता हायब्रिड एनयुटी (Hybrid Annuity) फेज–२ अंतर्गत मंजूर झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात रस्त्याचे नाव, दिशा आणि मार्गच कोड्यात टाकणारे आहेत.
लोहगाव–राहू हा मार्ग वाघोली–केसनंद–वाडेबोल्हाई मार्गे जातो, मग तो यवतला कसा जोडला जाणार?
यवत ते पारगाव साठी आधीच स्वतंत्र रस्ते असताना नक्की कोणत्या रस्त्यासाठी ४०९ कोटी ४० लाख? हा प्रश्न नागरिकांच्या डोक्यात घुमतो आहे.

तालुक्यात “भरघोस निधी आला” असे फलक ओरडून सांगतात, पण हा निधी प्रत्यक्षात खर्च होतोय का?
झाल्यास कामांचा तपशील नागरिकांना समजेल अशा भाषेत का नाही?
फलक माहिती देण्यासाठी की नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी? असा थेट सवाल उपस्थित होतो आहे.

अधिक धक्कादायक बाब म्हणजे —
निधी देणारे कार्यालय कुठे आहे, हेच अर्ध्या दौंडकरांना माहीत नाही.
अधिकाऱ्यांची नावे नाहीत, फोन नंबर नाहीत, संपर्कच नाही.
मग फलकावरील माहिती खरी की खोटी, हे तपासायचे तरी कसे?
यामुळे नागरिकांनी स्वतःच “कार्यालय शोध मोहीम” सुरू केली असून फोनवरून एकच प्रश्न विचारला जातोय — “तुला माहीत आहे का?”

कागदावर कोट्यवधींच्या आकडेवारीत तालुका विकसित दिसतो, पण जमिनीवर रस्त्यांची अवस्था काय आहे?
हा प्रश्न आता गंभीरपणे उपस्थित झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील विविध गावांमधील नागरिक आवाज लोकशाहीच्या संपर्कात येत असून आपल्या परिसरातील रस्त्यांची खरी स्थिती मांडू लागले आहेत.

लोकांचा आवाज म्हणून ‘आवाज लोकशाही’
रोज रस्त्यांचा, निधीचा आणि जबाबदारीचा खरा हिशेब नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहे.
तुमचा प्रश्न, तुमचा अनुभव, तुमचा आवाज — आम्ही प्रसारित करणारच.