आवाज लोकशाहीचा..
विजय चव्हाण
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तालुक्यात हजारो कोटी रुपयांचे रस्ते विकासकामे झाल्याचा दावा केला जातो. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर मोठमोठे फलक झळकावून विकासाचा गाजावाजा करण्यात आला. रस्ते, सभामंडप, बंदिस्त गटारी, शाळा खोल्या, पिण्याचे पाणी अशा कामांचा खर्च तपशीलासह फलकांवर मिरवला गेला.
मात्र प्रत्यक्षात विकास कुठे आहे? हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे.तालुक्यात पाच कोटींचा रस्ता गायब केला आहे की त्याला मातीत गाडला आहे असा दौंड तालुक्यातील नागरिकांना अस्वस्थ करत आहे.
दौंड तालुक्यातील लिंगाळी–माळद प्रजिमा क्रमांक १८६ या रस्त्यासाठी तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर असल्याचा फलक गेल्या वर्षभरापासून रोवून उभा आहे.
ठेकेदार म्हणून अमित कन्स्ट्रक्शन, खोपडी असे नाव झळकते, मात्र कामाची निविदा तारीख, काम सुरू व पूर्ण करण्याची तारीख — काहीच नाही.
आणि प्रत्यक्षात?
त्या फलकाच्या बाजूलाच धुळीचा, मातीचा, खड्डेमय रस्ता नागरिकांच्या नशिबी आहे.
फलकावर सार्वजनिक बांधकाम उपविभाग दौंड असे ठळक नाव असून उद्घाटक म्हणून आमदार राहुल कुल यांचेही नाव झळकते.
मात्र प्रश्न असा आहे की – रस्ता झाला कुठे?
झाला असेल तर कधी? नाही झाला तर ५ कोटींचा आकडा कुणाच्या खिशात गेला?
ही केवळ एकच घटना नाही.
तालुक्यात असे अनेक रस्ते ‘गायब’ असल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे.
ओरड झाली की तात्पुरती डागडुजी, निकृष्ट दर्जाचे काम आणि काही महिन्यांत पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली नवीन निधीचा खेळ ,हा प्रकार नागरिकांना वेड्यात काढणारा प्रामाणिक धंदा बनला आहे, असा संताप व्यक्त होत आहे.
गेल्या पंधरा वर्षांत सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या रस्त्यांची, खर्चाची, ठेकेदारांची आणि त्यावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी झाली, तर तालुक्यातील मोठा भ्रष्टाचार उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम सूर नागरिकांमध्ये उमटत आहे.
पाच कोटींच्या रस्त्याचे काय झाले?
फलकावर माहिती का लपवली?
उत्तर देण्याची जबाबदारी कुणाची?
आज फलक उभा आहे, पण रस्ता नाही.
म्हणजेच या कार्यालयाला ‘पाय फुटले’ की काय?
की हे कार्यालयच भ्रष्ट कारभाराचे आगार बनले आहे, असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
या सगळ्या प्रकारामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर संशयाचे सावट गडद झाले असून,
हा विषय वादळी चर्चेचा केंद्रबिंदू ठरणारच आहे — आणि तो झाला आहे.



