आवाज लोकशाहीचा. विजय चव्हाण…
दौंड, ता.— तालुक्यातील बांधकाम विभागात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार, संगनमत आणि दर्जाहीन कामांचा गंभीर आरोप पुढे येत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विभागातील अधिकारी, निवडक ठेकेदार आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या प्रभावी व्यक्तींच्या संगनमतीने लाखो–कोटोंचा निधी वाया जात असल्याचा आरोप जनतेतून सर्रास केला जात आहे.
निधी खर्चाचा तपशील, मोजमाप पत्रके, कामांची गुणवत्ता याबाबत सर्व माहिती जाणीवपूर्वक दडवली जात असून सामान्य नागरिकांना कोणतीही पारदर्शकता दाखविण्यात येत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
गेल्या १५ वर्षांत करण्यात आलेल्या रस्ते व बांधकाम कामांचा अभ्यास केल्यास अनेक कामांमध्ये खोदाई, भराई, मुरुम, खडी यांच्या मोजमापात तफावत आढळल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. रस्त्यांची रुंदी मुद्दाम कमी करून अधिक बिल काढणे, अंदाजपत्रक न पाळणे हा प्रकार नियमितपणे होत असल्याचा आरोपही केला जात आहे.
तालुक्यात उभारलेले अनेक रस्ते सहा महिन्यांतच उखडतात, डांबर मातीसारखे भुसभुशीत होते, खडी रस्त्यावर उडून वाहने व पादचाऱ्यांसाठी धोका निर्माण करते. अशा निकृष्ट दर्जामुळे दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा निधी मागविणे व पुन्हा कामे देणे हा चक्रावून टाकणारा प्रकार वर्षानुवर्षे सुरू असल्याची तक्रार आहे.
कमी दराने टेंडर मिळवून नंतर “काम परवडत नाही” असे सांगत अतिरिक्त निधी मंजूर करून घेण्याची पद्धत ही विभागातील सर्वांत चर्चेतील बाब ठरली आहे. काही ठेकेदारांनी अल्प कालावधीत प्रचंड आर्थिक प्रगती केल्याने या व्यवहारांची शंका अधिक गडद होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ठेकेदार एकटा भ्रष्टाचार करत नाही; त्याला अधिकाऱ्यांची तांत्रिक साथ आणि प्रभावशाली व्यक्तींचे राजकीय संरक्षण मिळत असल्याने संपूर्ण व्यवस्था भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली आहे. विकासकामांच्या नावाखाली “अली बाबा आणि चाळीस चोरांची टोळी” तालुक्याच्या निधीचा उपसा करत असल्याची टीका जनतेतून होत आहे.
निधींचा अनियमित वापर, कामांची निकृष्ट गुणवत्ता, पारदर्शकतेचा पूर्ण अभाव यामुळे विभागावरील विश्वास कमी होऊ लागला आहे. या गंभीर आरोपांवर प्रशासनाने तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



