डॉ. बाबा आढाव यांचे निधन : कष्टकरी चळवळीचा दीपस्तंभ कायमचा मावळला

आवाज लोकशाहीचा

पुणे, दि.— परिवर्तनवादी चळवळ, हमाल पंचायत आणि कष्टकरी हक्कांच्या लढ्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने महाराष्ट्रातील सामाजिक आयुष्याचे एक तेजस्वी पर्व संपले. आयुष्यभर तळागाळातील जनतेच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या या व्रतस्थ कार्यकर्त्यांच्या जाण्याने राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्याची प्राणज्योत सोमवार दिनांक ८डिसेंबरला सायंकाळी साधारण ८.२५ ला मावळली आहे
१९३० साली पुण्यात जन्मलेल्या बाबांनी वैद्यकीय व्यवसाय सोडून आयुष्य कष्टकरी, हमाल आणि दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी अर्पण केले. १९६३ मध्ये स्थापन झालेल्या “हमाल पंचायत” या ऐतिहासिक संस्थेमार्फत त्यांनी हमालांच्या निवाऱ्यापासून शिक्षणापर्यंत, कष्टकरी भोजनालयापासून पतपेढीपर्यंत अनेक उपक्रम उभे केले. ‘कष्टाची भाकर’, हमाल भवन, हमालनगर गृहरचना, रिक्षा पंचायत, कष्टकरी विद्यालय अशा योजनांनी हजारो कुटुंबांचे आयुष्य बदलले.

राजकीय पदाची चमक नको म्हणून बाबांनी १९७१ मध्ये नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन, आणीबाणीविरोधातील लढे, महागाई मोर्चे, मराठवाडा नामांतर संघर्ष, “एक गाव एक पाणवठा” अशा असंख्य आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. ५० हून अधिक सत्याग्रहांत त्यांना तुरुंगवास भोगावा लागला, हा त्यांच्या संघर्षशील जीवनाचा उल्लेखनीय भाग.

जात–धर्माच्या चौकटीबाहेर जाऊन त्यांनी शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारांचा ध्यास घेत समाज परिवर्तनाचे कार्य अखंडपणे सुरू ठेवले. त्यांच्या कार्याचा प्रभाव भवानी पेठ, गुलटेकडी परिसरात वाढला आणि पुढे तो राज्यभर पसरला.

स्थानिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, “बाबांचे काम हे केवळ संस्था उभारण्यापुरते नव्हते; त्यांनी कष्टकरी जनतेला स्वाभिमान, हक्क आणि अस्तित्व दिले. त्यांच्यासारखी मनुष्यबळ घडवणारी माणसे दुर्मिळ होत चालली आहेत.”

डॉ. आढावांच्या निधनाने कष्टकरी वर्गाच्या संघर्षाला दिशा देणारे एक युग मावळल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. समाजातील असंख्य कार्यकर्ते, संस्था आणि नागरिकांनी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शोक व्यक्त करून, “त्यांच्या कार्यातून नवीन पिढी घडवणे हीच खरी आदरांजली,” अशी भावना व्यक्त केली आहे.