बदली असूनही वर्षभर यवत येथेच ठेवून मानसिक त्रास दिल्याचा निखिल रणदिवे यांचा आरोप; ‘माझ्या मुलांचा बाप कुठे आहे?’ – पत्नीचा संताप
आवाज लोकशाहीचा
यवत, दि. ६ (प्रतिनिधी)
यवत पोलिस ठाण्यात आज दुपारी अचानक तणावाचे वातावरण निर्माण झाले. “माझा नवरा कुठे आहे? तो मला आत्ताच्या आत्ता हवा आहे!” असा आक्रोश करत एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीने दोन लहान मुलांना घेऊन पोलिस ठाण्यात प्रवेश केला. तिच्या या भावनिक उद्रेकामुळे तेथे उपस्थित अधिकारी व पत्रकार क्षणभर स्तब्ध झाले.
बेपत्ता झालेला कर्मचारी निखिल रणदिवे हा पूर्वी यवत पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होता. गेल्या वर्षभरापूर्वी त्याची बदली शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये झाली होती. मात्र, यवत पोलिस स्टेशनचे अधिकारी नारायण देशमुख यांनी त्याला नवीन ठिकाणी रुजू होऊ न देता यवत येथेच ठेवले व विविध प्रकारे त्रास दिल्याचा गंभीर आरोप निखिलने आपल्या मोबाईलवरील संदेशातून केला आहे.
निखिलच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या मजकुरात त्याने लिहिले आहे की—
“दीदी, आज तुझा पहिला वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करायचा होता. पण यवत पोलिस स्टेशनचे अधिकारी नारायण देशमुख यांच्या महिला गेल्या वर्षभरापासून देत असलेल्या त्रासामुळे मी येऊ शकत नाही. तुला पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा.”
हा संदेश समोर आल्यानंतर पोलिस विभागात खळबळ उडाली असून निखिलचा मोबाईल गेल्या २४ तासांपासून बंद आहे. त्याचा कोणताही ठावठिकाणा न लागल्याने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
निखिलची पत्नी पोलिस ठाण्यात आक्रोश करत असताना दौंड डीवायएसपी बापूराव धडस, तसेच उपस्थित पत्रकार त्या ठिकाणी होते. यवत आणि दौंड येथील पोलिस अधिकाऱ्यांना भेटूनही तिला दिलासा न मिळाल्याने तिने तीव्र नाराजी व्यक्त केली. “माझ्या पोरांच्या बापाला कुठेतरीून आणा. मला तो जिवंत हवा आहे,” असे तिने अधिकारीसमोर स्पष्ट सांगितले.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी तपास सुरू केला आहे. निखिलच्या शोधासाठी विविध पथके तयार करून जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणी चौकशी सुरू आहे.
एका पोलिस कर्मचाऱ्याने दबाव, मानसिक त्रास आणि कार्यस्थळावरील छळ याबाबत आपल्या संदेशातून केलेल्या उल्लेखामुळे संपूर्ण विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
निखिलचा शोध लागेपर्यंत यवत पोलिस स्टेशनसह वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.



