दौंड आमदाराच्या राहू गावातील रस्त्यांची अवस्था सुद्धा, तीन तेरा नऊ बारा ,रस्त्यांच्या खड्ड्यात केले नागरिकांनी वृक्षारोपण?

आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण…

दौंड तालुक्यात सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या माध्यमातून होत असलेल्या रस्ते कामांची निकृष्ट गुणवत्ता अखेर नागरिकांनीच उघड पाडली आहे. राहू गावच्या नवले मळ्यातील नागरिकांनी अक्षरशः रस्त्यातील खड्ड्यांत वृक्षारोपण करून निषेध नोंदवला आहे. हा प्रकार एकट्या रस्त्याच्या दुरवस्थेचा नसून—संपूर्ण प्रणालीतील खोलवर रुजलेल्या भ्रष्टाचाराचा कच्चा चिट्ठाच उघडा पाडतो.

आमदार राहुल कुल यांच्या गावातील रस्त्यांची अशी अवस्था असेल तर तालुक्यातील इतर रस्त्यांचे भवितव्य काय असणार? हा प्रश्न आता अधिकच तीव्रपणे उपस्थित केला जात आहे.

दोन वर्षांपूर्वी नवले मळा परिसरातील रस्ता तयार करण्यासाठी तब्बल ७५ लाखांचा निधी मंजूर केला होता. दोन वेळा रस्ता करण्याचा दिखावा झाला—परंतु काम प्रत्यक्षात शून्य.
याहूनही गंभीर म्हणजे या कामाचा माहिती फलक लावलेला नाही, आणि अधिकारी त्याबाबत माहिती देण्यासही टाळाटाळ करीत आहेत.

यातूनच निधी मंजुरी, ठेक्याचे नाव, अंदाजपत्रक आणि प्रत्यक्ष काम—या सर्वांचा खेळ संगनमताने चालतोय हे स्पष्ट होते.


दौंड तालुक्यात बहुतेक रस्त्यांची कामे एका ठराविक ठेकेदाराच्या नावावर दिली जातात, पण प्रत्यक्ष काम मात्र दुसरेच लोक करतात, असा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे.
ठेकेदार-अधिकारी संगनमताने कामे विभागून घेत असल्याचा संशय पक्का होत आहे.

यामागे पडद्याआडून आशीर्वाद देणारा “अका” असल्याची चर्चा देखील जोरात आहे

तालुक्यात गेल्या काही वर्षांत हजारो कोटी रुपये रस्त्यांवर खर्च झाले. परंतु गुणवत्तेचा आलेख सतत कोसळत चाललेला आहे.
लोकप्रतिनिधीही या गंभीर प्रश्नावर जाहीरपणे एक शब्द बोलताना दिसत नाहीत, हे अधिक चिंताजनक.

शासन निधी गावगावात आणायचा आणि ठेकेदार–अधिकारी–अका या त्रिकोणाने त्याची लूट करायची, अशी पद्धत तालुक्यात पक्की रुजली का?

राहूतील रस्त्यांची आजची अवस्था पाहता या प्रश्नाचे उत्तर भीतिदायकच वाटते.

काम न झाल्यामुळे खड्यांनी भरलेल्या रस्त्यांवर नागरिकांनी झाडे लावून थेट प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारला आहे
“आम्ही किती दिवस अशा भ्रष्ट आणि निष्क्रिय यंत्रणेचे बळी ठरणार?”

हा प्रतीकात्मक निषेध बांधकाम विभाग आणि ठेकेदारांच्या कारभाराची अब्रू पूर्णपणे चव्हाट्यावर आणणारा ठरला आहे.


संपूर्ण विभागाची भूमिका जाणूनबुजून “आंधळे–बहिरे” असल्याची टीका लोक करत आहेत.
डोळे असून न पाहणे आणि कान असून न ऐकणे —
या भूमिकेमुळेच भ्रष्ट कारभार राजरोस, बिनधास्त आणि बेधडक सुरू असल्याचा आरोप होत आहे.

राहू बेटासह संपूर्ण तालुक्यात या प्रकाराने तर्क–वितर्क, चर्चा आणि रोष शिगेला पोहोचला आहे.
रस्त्यांवरील प्रचंड खर्च, त्याची निकृष्ट गुणवत्ता आणि त्यामागील साखळी
ठेकेदार , अधिकारी ,अका , रस्ता भ्रष्टाचार मॉडेल
हे समीकरण आता नागरिकांच्या तोंडी–तोंडी फिरू लागले आहे