**आवाज लोकशाहीचा
दौंड पालिका निवडणूक वार्तापत्र
विजय चव्हाण
दौंड नगरपालिका निवडणुकीचा निर्णायक दिवस उजाडला आहे.
टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप, समाजसेवेच्या घोषणा, तारणहारांच्या फुशारक्या—या सर्व गदारोळाचा शेवट करत आज मतदार राजा मतदानासाठी सज्ज झाला आहे.
गेल्या नऊ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर होणाऱ्या या निवडणुकीचा प्रवास वेगवेगळ्या घटनांनी गजबजलेला. रात्रीच्या अंधारात बेल वाजवून फिरणारे, दराच्या कड्या हलवून मतांची खरेदी-विक्री करण्याचे प्रयत्न, सोशल मीडियावरील चर्चा, आरोपांचे ढग—हे सर्व अनुभवून आता जनता शांतपणे मतदानाच्या रांगेत उभी आहे.
या नऊ वर्षांत पालिकेचा कारभार जनतेसमोर पारदर्शक झाला.
अनेक विकासकामांवर प्रश्न उपस्थित झाले, कामांच्या गुणवत्तेबाबत शंका निर्माण झाल्या, समाजकारणाचा चिखल उडाला—हे सर्व पाहूनच मतदार आज मतदान केंद्रात पोहोचत आहेत.
मतदान म्हणजे केवळ बटण दाबणे नव्हे
तर आपल्या भविष्याचा निर्णय आहे याकडे गांभीर्याने पाहा,
मतदार हा लोकशाहीतील सर्वोच्च अधिकारी.
आजचा दिवस त्याच्या अधिकाराचा उत्सव आहे.
कोणत्याही प्रकारच्या लोभाला, प्रलोभनाला बळी न पडता आपल्या सद्विवेकबुद्धीने निर्णय घेण्याची वेळ मतदारासमोर आहे.
कारण चुकीच्या निर्णयाची किंमत पाच वर्षांच्या विकासातील विलंब, तक्रारींचा ओघ आणि पुन्हा त्याच वर्तुळात अडकून पडणे अशीच असते.
शहराच्या भवितव्याचा निर्णय करणारा दिवस
गजबजलेल्या दौंड शहराचे वातावरण आज वेगळे वाटत आहे.
शहराच्या सामाजिक सुविधांची जबाबदारी पेलणारे, विकासाची दिशा ठरवणारे,
सेवाभावी वृत्तीचे खरे प्रतिनिधी निवडून देण्याचा क्षण आज आला आहे.
मतदान गुप्त असते.
राजकारणामुळे निर्माण झालेल्या दुरावा, भाऊबंदकीतील कटुता,
शेजाऱ्यांमधील भिंती—हे सर्व दूर करून
हसत-खेळत लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे.
अंधारात झालेले मनोमिलन संपवणारा दिवस
रात्रीच्या वेळी मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या सर्व गणितांना खरा मोडीत काढणारा दिवस म्हणजे मतदानाचा दिवस.
आज मतदार जे बटण दाबतील ते
पाच वर्षांसाठी समाजसेवेची हमी देणाऱ्या,
भ्रष्टाचाराविरोधात खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या व्यक्तीची निवड ठरवेल.
निर्णय सुज्ञ असला पाहिजे — समाजाचे भविष्य उज्ज्वल असले पाहिजे
प्रचारातून गेल्या काही दिवसांत झालेल्या टीका-टिप्पण्याचे परीक्षण करत
मतदारांनी आपल्या मनातील विचार निवडणूक यंत्रावर व्यक्त करायचे आहेत.
सद्विवेक जागा ठेवा, भवितव्याचा विचार करा,
शहराच्या विकासाला गती देणारा,
सामाजिक सुविधा उंचावणारा,
लोकसेवेची निष्ठा असलेला उमेदवार निवडून द्या.
मतदान करा — कारण आपल्या एका मतदानाने
दौंड शहराचे पुढील पाच वर्षांचे भविष्य ठरणार आहे



