दापोडी टोल नाका–खुटबाव रस्ता : डांबर गायब, खडी बाहेर!



कोट्यवधी खर्चून तयार झालेला रस्ता एका वर्षातच उखडला
आवाज लोकशाहीचा   .,.विजय चव्हाण……
दापोडी टोल नाका ते खुटबाव रस्त्यावरून डांबर गायब होऊन संपूर्ण खडी बाहेर आली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे वाहनचालकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत असून, कोट्यवधींचा निधी खर्चून तयार केलेला हा रस्ता वर्षभरातच निकृष्ट दर्जाचा असल्याचे उघड झाले आहे.
निकृष्ट काम – अधिकारी व ठेकेदारांची संगनमताची चर्चा
या रस्त्याच्या बांधकामासाठी मोठा निधी खर्च करण्यात आला होता. मात्र बांधकाम विभागाच्या ढिसाळ देखरेखीमुळे रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. ठेकेदार व बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांची सांठगाठ असल्याची उघड चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. तालुक्यातील अनेक रस्त्यांवरून दरवर्षी डांबर गायब होणे आणि खडी उघडी पडणे ही आता सामान्य बाब झाली असून, नागरिकांची फसवणूक होत असल्याचे स्पष्ट दिसते.
‘अर्धवट माहितीचे फलक’ : नवीन फंडा
कामांचे फलक गावागावात लावले जात असले तरी त्यावरील माहिती अपुरी आणि अर्धवट असते. नागरिकांकडून विचारणा झाल्यास संबंधित अधिकारी टाळाटाळ आणि टिंगल-टवाळी स्वरूपाची उत्तरे देत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. निधी वेगळा – काम वेगळे… हा प्रकार तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
गेल्या काही वर्षांत एका विशिष्ट अधिकाऱ्याच्या कार्यकाळात बहुतेक रस्ते आणि बांधकामांची गुणवत्ता गंभीर स्वरूपात खालावली आहे.
नदीवरील ब्रिजचे पोल काम पूर्ण होण्याआधीच वाकडे
कोट्यवधी खर्च करूनही क्रीडांगणाचा प्रकल्प तीन वर्षांपासून अपूर्ण
ठेकेदारांच्या वाहनातूनच तपासणी करणारी ‘खुली कार्यपद्धती’
या पार्श्वभूमीवर नागरिकांतून प्रशासकीय शिथिलते विरोधात नाराजी वाढत आहे.
निकृष्ट कामातून मिळालेली माया – निवडणुकीत मोठ्या प्रमाणात वापर
अल्पकाळात काही ठेकेदार आर्थिकदृष्ट्या बळकट झाले असून निवडणुकीत दारू वितरण, जेवणावळी आणि आमिषांचा वापर करून प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेलाच बदनामीचा डाग लागत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाचे फोटो, व्हिडिओ आणि तक्रारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सामायिक होत आहेत. पत्रकारांकडेही मोठ्या प्रमाणात माहिती पोहोचत असल्याने ठेकेदार-अधिकारी यांची सांठगाठ उघड होत आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक निधी – पण दर्जा सर्वात खालचा
दौंड तालुका विकास निधीच्या बाबतीत जिल्ह्यात अग्रभागी असला तरी गुणवत्ता मात्र अत्यंत खालावलेली आहे. अनेक रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केल्यास निधीचा अपव्यय आणि खालचा दर्जा स्पष्ट जाणवतो.

कोट्यवधींचा निधी, निकृष्ट दर्जा, ढिसाळ देखरेख आणि ठेकेदार-अधिकारी सांठगाठ यामुळे दापोडी–खुटबाव रस्ता हा तालुक्यात सुरू असलेल्या बदनामीकारक विकास मॉडेलचा जाज्वल्य नमुना ठरला आहे.