मुख्यमंत्री सडक योजनेत  कोट्यवधींचा  महा घोटाळा?

आवाज लोकशाहीचा विजय चव्हाण…
मुख्यमंत्री सडक योजनेत कोट्यवधींचा घोटाळा?
दौंड तालुक्यात मुख्यमंत्री सडक योजनेतील कामांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून रस्त्यांची निकृष्ट गुणवत्ता, कोट्यवधी रुपयांचा कथित अपव्यय आणि अधिकारी–ठेकेदार संगनमत यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे. “तपास करा, नाहीतर कार्यालयावर धडक मोर्चा काढू” असा इशारा नागरिकांकडून देण्यात येत आहे.
टक्केवारीसाठी गुणवत्तेचा बळी?
तालुक्यात करण्यात आलेल्या सडक कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. डांबराच्या नावाखाली मुरमाचे रस्ते, सुरुवातीला तडे जाणे, हमीअवधीतील देखभाल न करणे—या सर्वांमुळे सरकारी निधी वाया गेला, तर संबंधित अधिकारी आणि ठेकेदार आर्थिकदृष्ट्या “गुबगुबीत” झाल्याचा आरोप जनतेतून होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या विभागातील अनेक अधिकारी ठेकेदारांच्या वाहनांतूनच दौरे करतात. पुणे येथील कार्यालयात बसून फक्त कागदी मंजुरी देण्यात येते, तर प्रत्यक्ष कामाचे परीक्षण होत नाही. यामुळे ठेकेदार हिताला पोषक असे निर्णय घेतले जातात, असा आरोप आहे.
ठेकेदारांची झपाट्याने वाढलेली संपत्ती संशयास्पद
दौंड तालुक्यातील काही ठेकेदारांनी अल्पावधीतच कोट्यवधी रुपयांची मालमत्ता निर्माण केली असून काहींनी तर विदेशात कंपन्याही सुरू केल्याची चर्चा आहे. ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अक्षरशः ‘कब्जा’ केल्याचा आरोप नागरिक करीत असून मर्जीच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने अनेक कामे मिळाल्याचे सांगितले जात आहे.
‘तो’ अधिकारी आणि कथित राजकीय आश्रय
तालुक्यात दीर्घकाळ एका महत्त्वाच्या खुर्चीला चिकटून बसलेल्या एका अधिकाऱ्यावरही गंभीर आरोप झाले आहेत. ज्या काळात नदीवरील पुलाचा खांब पूर्ण होण्यापूर्वीच कोसळला, तो काळ याच अधिकाऱ्याचा होता. या घटनेला लक्षवेधी होऊ न देण्यासाठी कथित राजकीय ‘आशीर्वाद’ मिळाल्याचे नागरिक सांगतात.
चर्चेनुसार, या अधिकाऱ्याने तालुक्यात प्रचंड माया कमावली असून गावोगाव मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या आहेत. नवीन बदलीही राजकीय आडदांडीतूनच झाली, असा नागरिकांचा आरोप आहे. सध्या हा अधिकारी पुण्यातील गुणवत्ता नियंत्रण विभागात कार्यरत असून याच विभागाचा दर्जाहीन रस्त्यांना प्रमाणपत्र देण्यात मोठा वाटा असल्याची टीका होत आहे.
निकृष्ट रस्त्यांचा प्रश्‍न चिघळला
डांबर रस्त्यांच्या जागी मुरमीकरण, हमीअवधीतील देखभाल न करणे, परीक्षणात तडजोड—या सर्व प्रकारांमुळे सडक योजना “भ्रष्टाचाराचा महामार्ग” झाल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, गुणवत्ता परीक्षण व्यवस्थित झाले असते तर रस्त्यांची अवस्था आज इतकी दयनीय नसती.
‘अलीबाबा–चाळीस चोर’ अशी चर्चा
खामगाव, वरवंड, खोपोली, दहिटणे परिसरातील काही ठेकेदारांविषयी नागरिकांत प्रचंड रोष असून ही ठेकेदारी टोळी “अलीबाबा आणि चाळीस चोर” अशी ओळख मिळवत असल्याची चर्चा आहे.
मोर्चाची शक्यता
या सर्व भ्रष्टाचाराच्या कारभारामुळे तालुक्यात जनतेचा रोष टोकाला पोहोचला आहे. अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याची तयारी सुरू असल्याचे चित्र आहे. नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की— “सखोल चौकशी करा, नाहीतर रस्त्यावर उतरू.”

डांबर चोरीला गेलेला रस्ता
रोडवरील डांबर गायब डांबर चोरांचा कारोबार अधिकाऱ्यांचा आशीर्वाद