दौंड नगरपालिका निवडणुका : अर्जांचा महापूर, भाजपचा माघारयुक्त कोंडीचा खेळ?

आवाज लोकशाहीचा विजय चव्हाण……


दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीत अंतिम दिवशी अर्जांचा अक्षरशः पाऊस पडला. आतापर्यंत एकूण सुमारे २०० अर्ज दाखल झाले असून अखेरच्या दिवशीच तब्बल १२४ इच्छुकांनी आपापले अर्ज सादर केले.


नगराध्यक्ष पद ओबीसी महिला राखीव असल्याने या पदासाठी १३ उमेदवार मैदानात उतरले आहेत. छाननी आणि माघारीनंतर ही संख्या किती टिकून राहील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


नगरपालिकेचा कार्यकाळ तीन वर्षांनी वाढल्यानंतर अनेकांना सत्तेपासून दूर बसावे लागले होते. त्यामुळे या निवडणुकीत उत्साहाचा वेध अधिक जाणवत असून विविध गटांचे कार्यकर्ते अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ करताना दिसले.


या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसह त्यांचे मित्रपक्ष जोरात प्रचाराला सज्ज झाले असताना भाजपने मात्र निवडणूक टाळल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
शहरात भाजपचे स्वतंत्र अस्तित्व क्षीण असल्याने, “मित्रपक्षांच्या सावलीत वावरणाऱ्या भाजपची ही निवडणूक लाजिरवाणी ठरली”, अशी टीका नागरिकांतून होत आहे.
मतमोजणीच्या निकालानंतर भाजपला पुन्हा “मित्रपक्ष” हीच ओळख सांगावी लागणार, असा उपरोधही जनतेत ऐकू येतो.


२ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
दरम्यानच्या काळात भेटवस्तू, जेवणावळी, ‘माया’ मोहिमेद्वारे मतदारांच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची स्पर्धा रंगण्याची चिन्हे आहेत.
मतांची रात्रीच्या अंधारात होणारी पैशांत खरेदी-विक्री याविषयी देखील शंका-कुशंका नागरिकांत व्यक्त केल्या जात आहेत.

५० हजारांहून अधिक मतदार; शंभर टक्के हमी कुणालाही नाही

दौंड नगरपालिकेत तब्बल ५० हजारांहून अधिक मतदार असल्याने कुणीही शंभर टक्के मतांची हमी देऊ शकत नाही.
यामुळे प्रत्येक पक्षाचा उमेदवार आणि त्यांचे प्रचारक रात्रंदिवस गाठीभेटी, प्रचार मोहीम आणि डावपेच राबवताना दिसतात.

एरवी विकासकामांकडे दुर्लक्ष करणारे काही कार्यकर्ते देखील आता मतदारांसमोर ‘सर्वांसाठी विकास’ ही गुळगुळीत घोषणा घेऊन हजर होत आहेत.
हात जोडून आश्वासने देण्याचे आणि मत मिळवण्यासाठी हरतऱ्हेच्या युक्त्या लावण्याचे चित्र शहरभर दिसत आहे.

नगराध्यक्षपदाची लढत तापणार असून
नगराध्यक्षपदासाठी दाखल असलेले १३ अर्ज छाननीनंतर किती टिकतील याची प्रतीक्षा आहे.
सत्तेवर आपलाच नगराध्यक्ष असावा म्हणून सर्वच गट-पक्ष आपापल्या उमेदवाराचा विजय सुनिश्चित करण्यासाठी रात्रीचा दिवस एक करण्यास सिद्ध झाले आहेत.