आवाज लोकशाहीचा…
विजय चव्हाण…**विशेष वृत्त……..
दौंड नगरपालिकेची निवडणूक जवळ येताच काही तथाकथित नेते आणि कार्यकर्ते स्वतःची डाळ शिजवण्यासाठी मतदारांच्या खांद्यावरून खांदे बदलण्याचा उघडपणे खेळ खेळताना दिसत आहेत. निष्ठा, आदर्श, विचारसरणी हे शब्द त्यांच्या राजकारणातून पुसले जाऊन आता फक्त संधी, सौदेबाजी आणि वैयक्तिक स्वार्थ यांचीच नाणी खण खणू लागली आहेत.
कालपर्यंत एकमेकांवर विश्वास ठेवणारे, सोबत आंदोलने करणारे हेच लोक आज निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांचे विरोधक किंवा संभाव्य जुळवा जुळवीचे भागीदार बनले आहेत. कधी दिवसाढवळ्या तर कधी रात्रीचा फायदा घेत ‘मनोमिलन’ नावाची राजकीय गलिच्छ देवाणघेवाण सुरू आहे. यात मतदारांचा भरोसा या लोकांसाठी केवळ कवडी मोलाची वस्तू बनून बसला आहे.
शहराच्या समस्या डोक्यावर आहेत —
• मुतारीचा प्रश्न अजूनही मध्ययुगीन!
• महिलांना रात्री पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो!
• कचऱ्याचे डोंगर आणि त्यातून उठणारा उग्रवास!
• मोकाट जनावरांची दहशत!
• पार्किंगचा गोंधळ आणि मंदावलेले व्यापारी व्यवहार!
• तरुणांच्या रोजगारापेक्षा त्यांना कार्यकर्ता बनवण्याची नेत्यांची शर्यत!
या सगळ्यांतून लढणारे कुणी दिसत नाहीत. उलट शहराचा विकास फाट्यावर मारून फक्त पद, प्रतिष्ठा आणि पक्षांचे तिकीट मिळवण्यासाठी बेडूक उड्या मारणारे राजकीय खेळाडू सज्ज आहेत.
या सगळ्याची उदाहरणे शहराने आधीही पाहिलीत—
मनसेचे सचिन कुलथे यांचे गटारातील आंदोलन, मृतदेहाच्या घाणीच्या पाण्यातून काढलेली अंतिमयात्रा, कचरा ठेक्यावरून न्यायालयापर्यंत गेलेला वाद… ही घटना दौंडच्या प्रशासनाचा आणि राजकारणाचाच स्वरूप आणि स्वार्थ उघड करतात.
मतदार राजा ही फक्त निवडणुकीतल्याच भाषणातील घोषणा; प्रत्यक्षात मात्र दारूच्या बाटल्या, जेवणावळी आणि ‘भावनेच्या नात्या’च्या नावाखाली मतांची उघडी विक्री सुरूच आहे. लोकशाहीची पायाभूत व्याख्या या दळभद्री कारभाराने धुळधाण होत आहे.
शहराचा विकास वर्षानुवर्षे ठप्प… समस्या वाढत्या… आणि त्यावर उपाय करण्याऐवजी नेत्यांची फक्त उडी मारण्याची तयारी!
निवडणूक म्हणजे जनतेच्या हिताची लढाई नसून स्वार्थाच्या पोटपूजेसाठीची मोकळी चराई झाल्याचे चित्र यावेळी अधिक ठळकपणे दिसते.
दौंडच्या मतदारांनी यावेळी या बेडूक उड्यांच्या खेळाडूंना आरसा दाखवला तरच खरी लोकशाही मजबूत होईल— अन्यथा शहराचे भवितव्य हाच गोंधळ, हा भ्रष्टाचार आणि हीच ढोंगी राजकीय तिकडम भोगत राहील



