दौंड नगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकाच चिन्हावर एकत्रित निवडणूक लढविणार.सूत्रांची माहिती!

आवाज लोकशाहीचा…
ब्रेकिंग न्यूज — विजय चव्हाण

दौंड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत मोठ्या राजकीय उलथापालथीचे चित्र समोर येत आहे. काका–पुतण्याचे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता प्रबळ असून या समीकरणात उबठा शिवसेना गटही सामील होऊ शकतो, अशी ठोस माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. वरिष्ठ पातळीवरील चर्चा जवळपास अंतिम टप्प्यात असून काही तासांत या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या निर्णयामुळे दौंड तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ उडण्याची चिन्हे आहेत. काहींच्या गोटात तर धसक्याचे वातावरण निर्माण झाले आहे. काका-पुतण्यांच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाला खासदार सुप्रिया सुळे यांनीही संमती दर्शवल्याची माहिती मिळते.

भाजपा गोंधळात, तालुक्यातील काही भक्तांची धांदल

दौंड शहरातील हे नवीन गठबंधन भाजपासाठी मोठा डोकेदुखीचा विषय ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत. शहरापेक्षा तालुक्यातील काही कट्टर भाजपा भक्तांना याची अधिक झळ बसण्याची शक्यता आहे. भविष्यवाणी आणि राजकीय विश्लेषणाच्या नावाखाली सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्यांना आता पुन्हा ‘पंचांग’ चाळण्याची वेळ आलेली दिसते.

नगरहिता मंडळाचे समीकरण बदलणार?

मागील निवडणुकीत स्वतंत्र लढणाऱ्या नागरी हित संरक्षण मंडळाचा मोठा गट आता भाजपामध्ये विलीन झाल्याने, त्यांचे स्वतंत्र अस्तित्व यावेळी राहणार नाही, अशी चर्चा आहे. मंडळातील अनेक पदाधिकारी भाजपचे लाभार्थी पदावरील असल्याने ते थेट भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात आहे.

राहुल कुलांसाठी संधी

तालुक्यात भाजपा आमदार राहुल कुल यांचे अस्तित्व असल्यामुळे शहराबाहेर सत्ता वाढवण्याची नामी संधी त्यांच्या समोर आहे. नागरी हित मंडळातील अनेक कार्यकर्ते त्यांच्याकडे झुकत असल्याचे संकेत मिळत आहेत.

निवडणुकीचे चित्र बदलले — अर्ज दाखल न झाल्याने बदलती परिस्थिती

अर्ज भरण्याचे दोन दिवस उलटल्यानंतरही एकाही इच्छुकाने अर्ज न भरल्याने सर्व पक्ष ‘वेट अँड वॉच’ भूमिकेत असल्याचे दिसून आले. मात्र, अचानक घडलेल्या घटनांनी निवडणुकीचे संपूर्ण राजकीय संतुलन बदलले आहे.
याचा थेट परिणाम रणधुमाळीवर होणार असून विजय कोण खेचून आणणार? हा प्रश्न आता अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.

राष्ट्रवादी (दोन्ही गट) कशी भूमिका घेणार?

पुन्हा एकदा दोन गटात विभागलेली राष्ट्रवादी काँग्रेस तरुणांच्या नेतृत्वाखाली दौंड नगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आणि प्रामाणिकपणे काम करेल का?
हा देखील निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे.

एकूणच, दौंड नगरपालिकेची निवडणूक ही ‘समीकरणे बदलणारी’ ठरणार असून आगामी काही तासांत होणारे निर्णय संपूर्ण तालुक्यातील राजकीय हवामान पालटू शकतात.