आवाज लोकशाहीचा विजय चव्हाण
जिल्हा परिषद पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर काल (दि. 10) रात्री ठेकेदारांमध्ये जोरदार वादावादी झाली. टेंडर प्रक्रियेवरून झालेल्या या वादात काही ठेकेदारांनी एका ठेकेदाराला शिवीगाळ करत दमदाटीची भाषा वापरल्याची माहिती मिळाली आहे.
प्रत्यक्षदर्शींनुसार, हा वाद टेंडर मॅनेज केल्याच्या चर्चेतून सुरू झाला. काही ठेकेदारांनी आरोप केला की काही प्रभावशाली ठेकेदार प्रशासनातील अधिकाऱ्यांना गाठून चुकीच्या पद्धतीने टेंडर मिळवत आहेत. “अधिकारी आमच्या खिशात आहेत”, “लहान ठेकेदारांना आम्ही टेंडर प्रक्रियेतून दूर ठेवू” अशा शब्दांत धमकी दिल्याची चर्चा आहे.
या बाचाबाचीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरील शासकीय कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दोन्ही पक्षांना दालनाबाहेरून खाली जाण्यास सांगितले, असे समजते.
दरम्यान, जिल्हा परिषदेतील काही अधिकाऱ्यांचा आणि ठेकेदारांच्या एका विशिष्ट गटाचा संगनमत असल्याच्या चर्चेला या घटनेमुळे अधिक चालना मिळाली आहे. “केवळ तीन ठेकेदारांच्या गटालाच मोठी कामे मिळतात” अशी चर्चा सध्या पूर्ण तालुक्यात आणि जिल्हा परिषदेत सुरू आहे.
या प्रकरणाबाबत प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. लवकरच आवाज लोकशाहीचा आपण पुढे टेंडर आणि प्रशासन यांची कार्यप्रणाली सत्य उघड करणार आहे.



