पाटस / केडगाव परिसरात दहशत माजवणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना अटक, यवत पोलिसांची धडक कारवाई.

पाटस प्रतिनिधी : आवाज लोकशाहीचा

दौंड तालुक्यातील पाटस, केडगाव-चौफुला परिसरात शस्त्रसज्ज टोळ्या तयार करून दहशत माजवणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना यवत पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांच्या पाठलागानंतर जेरबंद केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वरवंड / पाटस यात्रेच्या पार्श्वभूमीवर हे आरोपी गंभीर गुन्ह्याच्या कटात गुंतले असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी धडक कारवाई केली. अटक केलेले आरोपी म्हणजे महेश मनोज दुर्बे (२२, रा. फराटे गल्ली, दौंड) महेश उर्फ मन्या संजय भागवत (२६, रा. तामखडा, पाटस), पृथ्वी अशोक खंडाळे (२३, रा. इरिगेशन कॉलनी, दौंड)  तसेच पोलिसांना हवा असलेला आदिनाथ ईश्वर गिरमे, सर्व सराईत गुन्हेगार. पोलिसांना हवा होता.


या घटनेचा थरार बुधवारी दि. ५, रात्री पावणे बारा वाजता पोलिसांना गुप्त बातमी मिळाली की, चौफुला येथील रेणुका कला केंद्रातील कोयत्याच्या हल्ल्याप्रकरणात हवा असलेला आरोपी आदिनाथ गिरमे पुणे-सोलापूर महामार्गावरून स्विफ्ट कार (MH 42 H 6241) मधून पाटस-कुसेगावकडे जाणार आहे. सहायक पोलीस निरीक्षक महेश माने यांनी वेळ न दवडता डी.बी. पथकासह नाकाबंदी उभारली. मात्र आरोपींनी कार पोलिसांवर चढवण्याचा प्रयत्न करत जीव वाचवण्यासाठी भरधाव वेगाने सुपा दिशेने पळ काढला. पोलिसांनीही तात्काळ पाठलाग सुरू केला.


कुसेगावच्या हद्दीत आरोपींची कार पलटी झाली आणि पोलिसांनी चारही गुन्हेगारांना ताब्यात घेतले. तपासात कारच्या डिकीतून दोन धारदार कोयते आणि लाकडी दांडके हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज करत आहेत.

अटक आरोपींपैकी महेश उर्फ मन्या भागवत हा तामखडा (पाटस) येथील दुहेरी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून सध्या जामिनावर होता. पाटस यात्रेदरम्यान गोंधळ घालण्याचा त्यांचा कट असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी योग्यवेळी कारवाई करून संभाव्य रक्तपात टाळला असताना

ही धाडसी कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक महेश माने, उपनिरीक्षक किशोर वागज, अक्षय मोरे, बाळकृष्ण गाडेकर, महेंद्र फणसे, राजीव शिंदे, गुरुनाथ गायकवाड, संदीप देवकर, अक्षय यादव, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, विकास कापरे, गणेश कुतवळ, जालिंदर बंडगर, मोहम्मदअली मडडी, मारूती बाराते, हनुमंत खटके, प्रतिक गरूड, भारत भोसले, विनोद काळे, श्रीकांत माने, शुभम मुळे, सचिन काळे, मोहन भानवसे आदींचा सहभाग होता.

यवत पोलिसांच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे यात्रेतील संभाव्य गुन्हेगारी प्रकार रोखण्यात यश आले असून स्थानिक ग्रामस्थ आणि यात्रेकरूंनी पोलिसांच्या शौर्यपूर्ण कारवाईचे मनापासून कौतुक केले आहे.