आवाज लोकशाहीचा ….
विशेष वृत्त | विजय चव्हाण,l
दौंड तालुक्यात गरुडा इन्फ्रा कंपनीच्या स्थापनेमागे नक्की कोणाचा डाव आहे? अनेक वर्षांपासून ठेकेदारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या तीन अनुभवी ठेकेदारांना अचानकपणे एकत्र येऊन कंपनी स्थापन करण्याची “बुद्धी” कशी सुचली — हा प्रश्न आता सर्वत्र चर्चेत आला आहे.
‘आवाज लोकशाहीचा’ने गरुडा इन्फ्राच्या कारभारावर प्रकाश टाकताच अनेक ठेकेदार आणि काही अधिकारी स्वतःहून संपर्क साधत आहेत. मात्र, त्यांचा एकच अट — “आमचं नाव कुठे सांगू नका!” या अटीखाली ते या नव्या कंपनीच्या गूढ धंद्याबाबत माहिती देण्याचं आश्वासन देत आहेत.
आर्थिक साम्राज्याचा डाव?
मिळालेल्या माहितीनुसार, गरुडाच्या उभारणीच्या मागे “अका” नावाच्या प्रभावशाली व्यक्तीचा हात असल्याची चर्चा जोरात आहे. या अका यांनी तालुक्यात गरुडा नावाने विविध उद्योग, व्यवसाय आणि भागीदारी स्वरूपातील व्यवहार सुरू केल्याची माहिती मिळते.
वेगवेगळ्या व्यवसायात वेगवेगळे भागीदार दाखवले असले तरी या सर्व धाग्यांचा केंद्रबिंदू एकच — अका!
दौंड, हवेली परिसरात गरुडाचे हे भागीदार पसरलेले असून, बहुतांश फक्त नाममात्र आहेत.
५० कोटींचा ठेका — तीन ठेकेदार एकत्र कसे?
सध्या तालुक्यातील ११ रस्ते विकास कामांसाठी तब्बल ५० कोटी ४२ लाखांचा ठेका गरुडा इन्फ्राने घेतला आहे.
या कंपनीतील भागीदार पूर्वीपासून तालुक्यात परिचित ठेकेदार आहेत.
एकाने राज्य राखीव पोलिस दल (SRPF) आणि नानवीज येथील मोठ्या बांधकामांमध्ये काम केले आहे.
दुसरा विदेशात कंपनी चालवणारा, पण पुणे महापालिकेतील काही ठेक्यांवरून वादग्रस्त ठरलेला.
तिसरा — कमी प्रसिद्ध पण या दोघांच्या जवळचा.
हे तिन्ही ठेकेदार राजकीय छत्रछाया असलेले आणि अधिकाऱ्यांच्या परिचयाचे. मग अचानक त्यांनी एकत्र येऊन नवी कंपनी सुरू करण्याची प्रेरणा कुठून आली?
‘गरुडा’ की ‘अका’ निष्ठा?
या नव्या कंपनीच्या स्थापनेचा उद्देश तालुक्याचा विकास नसून अका-निष्ठेचं प्रदर्शन असल्याची चर्चा ठेकेदारांमध्ये आहे. अनेक लहान ठेकेदारांनी “आम्हाला गरुडामुळे काम मिळणं कठीण झालं” अशी तक्रार व्यक्त केली आहे.
त्यांचं म्हणणं — “हे सर्व जाणूनबुजून आमच्यासाठी अडथळा निर्माण करण्यासाठीच केलं जात आहे.”
राजकीय आशीर्वाद आणि १८० कोटींचा ‘कट’?
सूत्रांच्या मते, अका यांच्या राजकीय आशीर्वादामुळेच १८० कोटींच्या प्रकल्पांमधून राजपत इन्फ्रा आणि एम.बी. पाटील कंपनीचा पत्ता कट करण्यात आला आहे.
ही माहिती काही अधिकाऱ्यांकडून समोर आली असली तरी, अधिकृत पुष्टी मात्र अजून मिळालेली नाही.
गरुडाभोवती तर्क-वितर्कांचं वादळ!
दौंड तालुक्यात “गरुडा” नावाच्या किती कंपन्या आहेत, त्यांचे भागीदार कोण आहेत आणि सर्वांना हेच नाव सुचण्यामागे कोणते सूत्र आहे — या प्रश्नांनी तालुक्यात वादळ माजले आहे.
नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचानक गरुडाच्या चर्चांना उधाण आल्याने राजकीय समीकरणेही ढवळून निघत आहेत.
गरुडाच्या क्लब टेंडर पद्धतीमुळे अनेक छोटे ठेकेदार उपेक्षित झाले असून, “ही यंत्रणा ठेकेदारांना गुलामगिरीकडे नेणारी आहे,” असा सूर ठेकेदार समाजातून उमटू लागला आहे.
गरुडा इन्फ्रा”चा उगम, भागीदारीचे व्यवहार, आणि त्यामागचा ‘अका कनेक्शन’ — या सर्वांचा शोध घेणं आता अत्यावश्यक झालं आहे.
दौंड तालुक्याच्या ठेकेदारी व्यवस्थेत सुरू झालेला हा गरुडवाद नक्की विकासाचं पंख फडकवणार की भ्रष्टाचाराचं गोंधळ उडवणार? — याचं उत्तर काळच देईल.



