सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या स्पर्धेवर लगाम
आवाज लोकशाहीचा ,बारामती प्रतिनिधी …..
दि. ०१ : बारामतीत दहशतीचे वातावरण निर्माण करत “व्हायरल” होण्याच्या हव्यासापोटी जाळ–धूर काढत बुलेट चालवणाऱ्या चार तरुणांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. कटफळ पालखी मार्गावरील ब्रिजखाली मोठ्या आवाजात बुलेट चालवत हे युवक रेसिंग करताना रील्स बनवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ दि. २० रोजी समोर आल्यानंतर बारामती तालुका पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कडक पावले उचलली आहेत.
सदर रील्समध्ये दिसणाऱ्या बुलेट मोटरसायकलींचे क्रमांक — MH 42 BH 7404, MH 12 PL 7637, MH 12 KM 8592 , MH 42 BA 5553, — असे असून, या चारही वाहनांना पोलिसांनी जप्त केले आहे. संबंधित चालकांविरुद्ध वाहतूक नियमांचे उल्लंघन, ध्वनी प्रदूषण आणि सार्वजनिक शांतता भंग केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ही वाहने १५ दिवसांसाठी डिटेन करण्यात आली आहेत.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात काही युवकांमध्ये “रिल्ससाठी स्टंट” करण्याची स्पर्धा वाढली असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. बुलेटच्या सायलेंसरमधून जाळ आणि धूर काढणे, रेसिंग करताना मोठा आवाज करणे या प्रकारामुळे वाहतुकीचा धोकाही वाढला आहे.
स्थानिक नागरिकांनी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीवर कडक कारवाई सुरू ठेवा अशी मागणी केली आहे.
पोलिसांचा इशारा :
“पेन्सिल चौक, एमआयडीसी परिसरात अथवा अन्य ठिकाणी कोणीही मोठ्या आवाजात, अतिवेगाने वाहन चालवताना आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. नियम मोडणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल.”
— चंद्रशेखर यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बारामती तालुका पोलिस ठाणे
ही कारवाई ‘व्हायरल संस्कृती’च्या नावाखाली कायद्याचा गळा घोटणाऱ्या तरुणांसाठी इशारा ठरली असून, बारामती पोलिसांची “कडक आणि तातडीची अंमलबजावणी” नागरिकांकडून कौतुकास्पद ठरली आहे.



