बारामतीचा “भाई” बनण्याच्या स्वप्नात असलेल्या तीन भामटे पैकी एक पोलिसांच्या जाळ्यात

दोन फरारी; ८५ हजारांची खंडणी वसुली उघड

आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण प्रतिनिधी, बारामती

बारामतीत “भाई” बनण्याची स्वप्नं पाहणाऱ्या भामट्यांना पोलिसांनी खुल्य चा दणका दाखविला . पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आपल्या धडाकेबाज कारवाईत एका बनावट डॉनला अटक करून थेट कोठडी दाखवली आहे, तर त्याचे दोन साथीदार फरारी आहेत. या कारवाईमुळे बारामतीतील नव्याने उगवणाऱ्या “भाई संस्कृती”ला जोरदार झटका बसला आहे.

अटक झालेल्या आरोपीचे नाव नीरज रॉय असे असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. तर शुभम मोरे आणि भूषण रणशिंगे हे दोघे अजूनही फरारी आहेत.
कटफळ (ता. बारामती) येथील एका लहान उद्योजकाकडून या तिघांनी “आम्ही बारामतीचे डॉन आहोत” अशी धमकी देत तब्बल ८५ हजार रुपये उकळले. ऑक्टोबर २०२४ पासून आरोपींनी या उद्योजकाला कधी ऑनलाईन, तर कधी प्रत्यक्ष भेटून पैसे देण्यास भाग पाडले. विविध हॉटेलमध्ये दारू पिऊन त्याचे बिल जबरदस्तीने भरायला लावणे, “महिन्याला हप्ता द्यावा लागेल नाहीतर कंपनी बंद करीन” अशा धमक्या देणे, शिवीगाळ आणि मारहाण या सर्व प्रकारांनी पीडित उद्योजक त्रस्त झाला होता.
पेन्सिल चौकात आणि वंजारवाडीजवळ आरोपींनी धमक्या देऊन २० हजार रुपये ऑनलाईन घेतले, त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि पुढे अमरदीप हॉटेल येथे आणखी १३ हजार मागणी केली.

या सर्व प्रकारामुळे शेवटी त्रस्त उद्योजकाने पोलिसात धाव घेतली. तक्रारीनंतर पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ तपास सुरू करून नीरज रॉयला गजाआड केलं. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून उर्वरित दोघा आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, आणि उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक युवराज पाटील तसेच राजेंद्र बन्ने, दादा दराडे, सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, संतोष कांबळे, निलेश वाकळे यांनी केली.

यादव यांच्या या कारवाईनंतर “भाई” बनण्याची स्वप्नं पाहणाऱ्या भामट्यांच्या काळजाचा ठोका चुकलाय.
बारामती पोलिसांची धडाकेबाज अ‍ॅक्शन म्हणजे शहरातील गुंडगिरीविरोधी लढाईला नवा वेग मिळाल्याचं बोललं जात आहे.