आवाज लोकशाहीचा…
पाटस प्रतिनिधी : विजय चव्हाण
पाटस (ता. दौंड) गावात केवळ ११ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असून, यवत पोलिस ठाण्यात उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
या घटनेनंतर सोशल मीडियावर काही अतिरेकी प्रतिक्रिया उमटल्याने गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचा ताण लक्षात घेता यवत पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
या वेळी शिरूरचे डी.वाय.एस.पी. प्रशांत ढोले, बारामती विभागाचे डी.वाय.एस.पी. सुदर्शन राठोड, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे अविनाश शीळीकर यांच्यासह ५० हून अधिक पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून शांतता राखण्याचे आवाहन केले.
पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी सहा पथके रवाना केली असून, नागरिकांकडून कोणतीही माहिती मिळाल्यास ती तत्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी यवत गावात एका तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यावेळी अधिक सतर्कता बाळगली असून, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
संवेदनशील प्रकरण असल्याने जातीय उल्लेख निष्पक्ष आणि जबाबदारीने हाताळला आहे.कायदेशीर चौकशी व मुलीची गोपनीयता राखण्यात आली आहे.



