आवाज लोकशाहीचा
विशेष वृत्त – विजय चव्हाण
पडवी परिसरात मुरूम तस्कराने महसूल प्रशासनाची अक्षरशः थट्टा उडवली आहे. “पैसे दिले की अधिकारी-कर्मचारी मुजरा करतात, मी कुठेही केव्हाही मुरूम चोरी करतो,” अशा उघड उघड भाषेत तो गावोगाव धमक्या देत फिरतो आहे.
सरकारी ठेकेदार झालेल्या या तस्कराला महसूल विभागातील एका महिला अधिकाऱ्याचा थेट आशीर्वाद असल्याची चर्चा सुरू आहे. या पाठबळावर तो महसूल कर्मचाऱ्यांची अब्रू काढत गावोगाव “महसूल खाते माझ्या खिशात आहे” असे सांगत फिरतो. नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तहसील कार्यालयाला महिन्याला तब्बल एक लाख रुपये, तर मंडल अधिकारी आणि तलाठी यांना दहा-दहा हजार रुपयांचे हप्ता पोचवले जातात.
यामुळे गेल्या पाच-सहा वर्षांपासून तो बेधडक उत्खनन करत असून, पडवी परिसरातील अनेक टेकड्या जमीनदोस्त झाल्या आहेत. पंचनामे झाले, अहवाल झाले, पण कारवाई मात्र कधीच झाली नाही. उलट महसूल विभागानेच डोळेझाक केल्याने या तस्कराचा धंदा दिवसेंदिवस फोफावत गेला.
नागरिकांमध्ये चर्चा आहे की, या तस्कराचा महसूल विभागात नातेवाईक उच्च पदावर आहे. तिच्या छत्रछायेखाली व राजकीय पाठबळावर त्याने आपले साम्राज्य उभे केले आहे. “तक्रार करा, काहीही होणार नाही, पैसे दिले की सर्व अधिकारी गप्प बसतात,” असे तो सरळसरळ सांगतो.

परिणामी, निसर्गाचा मोठा र्हास झाला आहे. टेकड्या उध्वस्त झाल्या, गावाचा पर्यावरणीय समतोल धोक्यात आला आहे. ग्रामस्थांमध्ये प्रश्न उपस्थित केला जातोय –
महसूल प्रशासन याकडे काम करतंय की कामाला लावतंय?पंचनामे झाले तरी पुढे कारवाई का होत नाही?राजकीय आशीर्वाद नेमका कुणाचा आहे?
दरम्यान, या तस्कराने ठेकेदारीतून व दादागिरीतून अधिकारी वर्गावरही आपली दहशत निर्माण केली आहे. महसूल खाते, राजकीय पाठबळ आणि नातेवाईक अधिकारी – या त्रिकुटाच्या जोरावर तयार झालेले ‘मुरूम साम्राज्य’ गावकऱ्यांच्या डोळ्यासमोर फोफावत आहे.
👉 ग्रामस्थांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, जर यावर तातडीने कारवाई झाली नाही तर पडवी परिसर निसर्गशून्य होऊन पुढील काळात भयावह संकटात सापडणार हे नक्की.



