आवाज लोकशाहीचा
यवत, प्रतिनिधी:
गेल्या आठवड्या पासून जातीय तणावाच्या खाईत लोटले गेलेले यवत गाव अखेर शांततेच्या दिशेने पहिले पाऊल टाकू लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कथित विटंबने नंतर उसळलेल्या हिंदू-मुस्लिम तणावाने गावात हिंसाचाराचा भडका उडाला होता. वाहनांची तोडफोड, जळालेली दुचाकी, अंगावर शहारे आणणाऱ्या सोशल मीडियावरील पोस्ट्स आणि गावातून पलायन करणारे नागरिक – या सर्वांचे साक्षीदार बनलेल्या यवतने शेवटी पोलिस आणि स्थानिक हिंदू-मुस्लिम बांधवांच्या पुढाकारातून शांततेकडे वाटचाल सुरू केली आहे.
दिवसाढवळ्या उसळलेल्या अफवांच्या आगीत खरंच ‘मानवतेचं भस्मसात’ झालं होतं. या आठवड्यात गावात काही विक्षिप्त घटनाही घडल्या – बाहेरून आलेल्या टोळक्यांनी गावकऱ्यांमध्ये दहशत पसरवणाऱ्या घोषणा दिल्या, चिथावणीखोर भाषणं केली आणि गावातल्या वातावरणाला अधिकच पेटवून टाकलं. परिणामी, जमावबंदी लागू झाली आणि मुस्लीम समाजातील काही तरुणांना गाव सोडून जाण्याची वेळ आली. गावापासून लांब पाहुणेरावळ्यात लपावं लागणं ही कायद्याच्या भीतीची मोठी किंमत होती.
शेवटी, या तणावातून मार्ग काढण्यासाठी यवत पोलिसांनी पुढाकार घेत, स्थानिक समाजबांधव आणि कारभाऱ्यांना समवेत घेऊन शांतता बैठक घेतली. चर्चेचा सूर होता — “आमचं गाव पुन्हा परत आणायचं आहे!” हीच भावना या बैठकीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
तथापि, प्रश्न अजूनही शिल्लक आहे – गाव कायद्याच्या बंधनातून मुक्त झालं असलं तरी, मनातून, विचारातून आणि विषारी द्वेषातून ते खरंच मुक्त झालं आहे का? सामाजिक सलोखा केवळ कागदावर नव्हे तर मनावर उमटेल तेव्हाच खरी शांतता प्रस्थापित होईल.
यवत गावाचा हा आठवडाभराचा संघर्ष पुढच्या पिढीला आणि वर्तमान पिढीलाही कायम स्मरणात राहील. ज्या विचारांनी गावात वणवा पेटला, तेच विचार शांततेचा विझवणारा पाऊस बनतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.



