आवाज लोकशाहीचा | यवत प्रतिनिधी
दौंड तालुक्यातील यवत परिसर सध्या दोन मोठ्या आणि धोकादायक घटनांमुळे धगधगत आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, तर दुसरीकडे अंबिका लोकनाट्य कला केंद्रात घडलेला गोळीबार – या दोन्ही घटनांनी कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेषतः या तपासामध्ये पोलीस यंत्रणेवर राजकीय हस्तक्षेप, पारदर्शकतेचा अभाव, आणि जनतेच्या रोषाची झळ पोहोचताना दिसत आहे.

अंबिका कला केंद्रातील गोळीबार: तपास की दडपशाही?
२२ जुलै रोजी रात्री अंबिका लोकनाट्य कला केंद्रात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. पोलिसांनी सुरुवातीस तीन आरोपी दाखवले, त्यानंतर चार जण न्यायालयीन कोठडीत गेले, आणि पुढे आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. मात्र, या प्रकरणात एक महिला कलावंत जखमी झाली होती की चक्कर येऊन पडली, हे अजूनही स्पष्ट करण्यात आलेले नाही. तिची माहिती, तिचे ठिकाण, तिच्यावर झालेले उपचार हे सर्व अद्याप गुलदस्त्यातच ठेवले गेले आहे.
या प्रकरणात कला केंद्राचे मालक, काही पत्रकार आणि पोलीस यांच्यातील संगनमत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जातो आहे. तसंच, भोर विधानसभा मतदारसंघाशी संबंधित काही राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे तपास अडथळ्यांत सापडला आहे, अशीही दबक्या आवाजातील चर्चा पोलिसांतूनच ऐकायला मिळते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची एका मुस्लिम तरुणाने विटंबना केल्याने यवत परिसरात तणाव वाढला आहे. या घटनेनंतर गावात बाहेरून आलेल्या हिंदू संघटनांचे कार्यकर्ते, संतप्त ग्रामसभा, आणि मुस्लिम समाजावर वाढती टीका, या गोष्टींमुळे जातीय तणावाचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कायद्याच्या अधीन असलेली व्यवस्था की राजकीय आडवळण?
या दोन्ही घटनांमधून दिसते ती गोष्ट म्हणजे – पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गदा येत आहे. संशयाच्या भोवऱ्यात असलेली महिला, आडवळणाने केलेले अटकेचे सत्र, तपासातली ढिलाई आणि तणावग्रस्त वातावरणात नागरिकांना दिलासा न देणारी भूमिका – या साऱ्यामुळे पोलीस बंधूंच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
पोलीस “शत्रूंचा नाश आणि रक्षणासाठी” म्हणूनच शपथ घेतात. मात्र सध्याच्या परिस्थितीत ते राजकीय शक्तींना भितात का, की जनतेच्या रोषासमोर असहाय झाले आहेत? हा प्रश्न अधिक ठळक होतो आहे.
यवतसारख्या गावांमध्ये अनेक वर्षांपासून टिकून असलेल्या हिंदू-मुस्लिम सलोख्याच्या धाग्यांना, अशा घटनांनी सुरुंग लावण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था केवळ गुन्हेगारांवरच नाही, तर प्रशासन आणि राजकीय इच्छाशक्तीवर अवलंबून असते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
यवत येथील घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून आज दिनांक ३१जुलै रोजी दौंड तालुक्यात बंदची हाक दिलेली असून सकल हिंदू संघटनेच्या वतीने यवत येथे सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे . संध्याकाळी सभा असून सभेला संबोधित करण्यासाठी गोपीचंद पडळकर संग्राम जगताप हे राजकीय मान्यवर सह जगद्गुरु स्वामीजी हेमांगी सखीजी (किन्नर आखाडा )या उपस्थित राहणार आहेत



