अंबिका कला केंद्रातील गोळीबारानंतर उघड होणारे अंधाऱ्या रात्रीचे रहस्य!”


आवाज लोकशाहीचा

केडगाव प्रतिनिधी……..

२२ जुलैच्या रात्री अकरा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास अंबिका लोकनाट्य कला केंद्राच्या बैठकीच्या खोलीत घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने दौंड तालुक्यातील कलाविषयक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. ही घटना एकट्या गोळीबारापुरती मर्यादित राहिलेली नसून, त्या मागे दलाली, राजकीय हस्तक्षेप, पत्रकारांतील हस्तगत आणि अनेक संशयास्पद प्रकरणांची जाळी असल्याचा आरोप लोकांमध्ये जोर धरू लागला आहे.
दडपण्याचा प्रयत्न आणि सोशल मिडियावर उघडकीस आलेला कट
सुरुवातीला हा गोळीबाराचा प्रकार दाबण्याचे प्रयत्न एका दलालामार्फत करण्यात आल्याचा ठपका अनेकांनी ठेवला आहे. मात्र सोशल मीडियाच्या ताकदीपुढे त्याचा ‘भागीरथी’ प्रयत्न अपयशी ठरला. या दलालाचे संबंध स्थानिक राजकीय कुटुंबांशी असल्याचे बोलले जात असून, तो स्वतःला ‘नेता-निष्ठ’ म्हणून सादर करत विविध सरकारी प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आहे.

कलाविषयक केंद्र, की दलालांची बडदास्त?

दौंड तालुक्यातील तीन लोकनाट्य कला केंद्रांपैकी, चौफुला येथील अंबिका केंद्र हे सर्वात चर्चेत आहे. पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेले हे केंद्र गेल्या काही वर्षांत ‘रसिकांच्या’ नव्हे, तर ‘प्रभुत्वाच्या’ केंद्रस्थानी असल्याचे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्रभरातून येणारे तथाकथित रसिक, त्यातील काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे, तर काही राजकीय आणि शासकीय अधिकारी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

विजेचा शॉक, गोवा ट्रिप आणि बंद खोलीतील ‘मैफली’

या केंद्रातील पूर्वीच्या काही घटना – जसे की विजेचा धक्का बसलेल्या तरुणाचा गुप्त व्यवहारातून राफा-दफा करणे – हे प्रकार दलालांनी हाताळल्याचे बोलले जात आहे. गोवा व पोंडेचरी येथे मालकांच्या सहली, रात्रीच्या जेवणावळीत खास अतिथींची ‘बैठकीतील मैफली’ यासंदर्भात देखील गंभीर आरोप केले जात आहेत.

पत्रकारितेवरही शंका: दलालांच्या संगतीत वावर?

या संपूर्ण प्रकरणात काही पत्रकार दलालांच्या गोटात असल्याची टीका जोर धरू लागली आहे. ‘पत्रकार म्हणून की दलाल म्हणून?’ असा प्रश्न सध्या चर्चेचा विषय बनला आहे. काहीजण याला पत्रकारितेवर कलंक म्हणत असून, काही निष्पक्ष पत्रकारांना याचा फटका बसतो आहे.

पोलीस, मालक आणि ‘त्या’ मध्यस्थावर प्रश्नचिन्ह

२२ जुलैच्या गोळीबार प्रकरणाचे पुढचे तपशील पोलिस तपासानंतरच स्पष्ट होतील. मात्र या प्रकरणात जे जे नावं गुंतलेली आहेत त्यांच्याकडूनच खरं काय आहे हे कळेल, असं नागरिकांचे म्हणणे आहे. सध्या तरी पोलिस, कलाकेंद्राचा मालक, कलाकार आणि त्या दलालाच्या त्रिकोणातच सत्य लपले आहे.



अंबिका लोकनाट्य कला केंद्राच्या घटनेवरून पुढे येणाऱ्या मुद्द्यांवर सखोल तपास आणि चौकशी होणे आवश्यक आहे. ‘कला’च्या नावाखाली सुरू असलेले हे सावत्र व्यवहार हे दौंड तालुक्याच्या सांस्कृतिक प्रतिष्ठेस आणि कायदा-सुव्यवस्थेला मारक ठरत आहेत का, याची उत्तरं आता प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडे आहेत.