घुंगरांचा आवाज थांबेल, पण कलावंतांच काय ? अशोक जाधव!



– न्यू अंबिका कला केंद्राच्या जाधव यांची भावना ‘आवाज लोकशाहीचा’शी बोलताना व्यक्त

आवाज लोकशाहीचा | विशेष प्रतिनिधी

दौंड :
“कलेला बदनामीचा डाग लावण्यासाठी एखादा प्रसंग पुरेसा ठरतो – तोही कलावंताकडून घडलेला नसतानाही! पण ज्या कलेच्या जोरावर अनेक पिढ्या जगल्या, त्यांचं आयुष्य समजून घेण्याची समाजाची जबाबदारी कुठे गेली?” असा भावनिक सवाल न्यू अंबिका कला केंद्राचे संचालक अशोक जाधव यांनी आवाज लोकशाहीशी बोलताना उपस्थित केला आहे.

२१ जुलै रोजी न्यू अंबिका कला केंद्राच्या बंद खोलीत झालेल्या पिस्तूलाच्या आवाजाने संपूर्ण राज्यभर वाद सुरू झाला. ‘घुंगरांचा आवाज थांबला’ अशा मथळ्यांनी माध्यमांतून चर्चा झाली. पण या घटनेच्या निमित्ताने कलावंतांच्या जगण्याची आणि त्यांच्या व्यथांची दखल कोण घेईल का?

चार भिंतीतील कला बदनाम, पण त्यामागचं आयुष्य?”

जाधव म्हणतात, “गेल्या अनेक पिढ्या उघड्यावर तमाशा सादर करत होत्या. काही दशकांपूर्वी बंद खोलीत सन्मानाने तमाशा दाखवणाऱ्या रसिकांचा उदय झाला. मात्र ‘बैठकी’ किंवा ‘पार्टी’ अशा नावांनी या कलाक्षेत्राला चुकीचा अर्थ लावून बदनाम केलं गेलं. समाजाने या कला केंद्रात नाचणाऱ्या मुली, मध्यमवयीन महिला, आणि त्यांना साथ देणारे वृद्ध कलाकार – यांचं संपूर्ण आयुष्यच दुर्लक्षित केलं.”

कलेला ग्राहक, रसिक, समाज – कोणीच समजून घेत नाही”

या चार भिंतींमध्ये घडणारी कला बहुतेकदा देहविक्रय समजली जाते. पण जाधव स्पष्ट करतात, “कोणताही कलाकार ग्राहकांना आमंत्रित करत नाही. जे येतात ते रसिक असतात. त्यांच्यासाठीच हे सादरीकरण असतं. त्यामागे कोणाचंही उद्दिष्ट गैरप्रकार करण्याचं नसतं.”

कलावंत, वादक, गायक – हे सर्व मिळूनच फड साकारतात. “आजीबात घुंगरू बांधता न येणारा वृद्ध कलाकारही गाणं म्हणतो, त्याला साथ देतो, आणि त्यातून त्याची उपजीविका होते. ही कला जर नसेल, तर त्यांचं पोट कसं भरायचं?” असा कळवळा जाधव व्यक्त करतात.

डीजे लावून चालणारी कला केंद्रं आणि पारंपारिकतेचा मृत्यू”

सध्या महाराष्ट्रात ७० हून अधिक लोकनाट्य केंद्र कार्यरत आहेत. त्यातील निम्म्यांमध्ये पारंपारिक वाद्यं हरवली आहेत. साऊंड सिस्टिम, डीजेच्या तालावर फड सादर होतात. अशा ठिकाणी कोणत्या घटना घडतात हे स्पष्ट सांगणं कठीण आहे. मात्र जिथं ढोलकी, पेटी, तबला आणि पारंपरिक घुंगरू आहेत, तिथंच खरी कला टिकते, असं जाधव ठामपणे सांगतात.

“या कलाकारांचं काय?” – एक सामाजिक प्रश्न

“कलेतून उपजीविका करणाऱ्या या कुटुंबांचं प्रबोधन, शिक्षण आणि समाजात पुनःस्थापना यासाठी प्रशासन, समाजसेवक आणि राजकारणी पुढे का येत नाहीत?” असा थेट सवाल जाधव करतात.
“वेश्याव्यवसाय बदलण्यासाठी संघटना आहेत, कचरा वेचणाऱ्यांसाठी बाबा आढाव काम करतात, वीटभट्टी कामगारांसाठी उपक्रम आहेत… पण लोकनाट्य कलावंतांबाबत विचार करणारा कुठे आहे?” – ही खंत प्रकर्षाने जाणवते.

आता तरी कोणी समजून घेईल का?”

“या कलावंतांचं संपूर्ण जीवनच ‘रसिक’वर अवलंबून आहे. पण रसिक समाजही फक्त डोळ्यांनी पाहतो – डोळ्यांतून समजून घेत नाही. आम्ही बदनाम होतो, आम्हावर आरोप होतात, पण आमचं कोण समजून घेणार?” – जाधवांचा हा भावनिक सवाल आपल्या विवेकाला डिवचणारा आहे.:

“कलावंतांना समजून घेणारा समाज निर्माण होण्याची वेळ आता आली आहे. अन्यथा हे ‘घुंगरं’ एक दिवस कायमची शांत होतील!”  आणि डीजेच्या तालावर कर्कश आवाजातील हैदोस धिंगाणा सर्वत्र पाहायला मिळेल यात शंका नाही अशी भीती डीजेच्या तालावर सुरू झालेल्या कला केंद्रांकडे पाहताना ते व्यक्त करीत आहेत.