यवत गाव बंद, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; ग्रामस्थ आक्रमक

आवाज लोकशाहीचा
यवत : प्रतिनिधी

यवत स्टेशन परिसरातील नीलकंठेश्वर मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तीने विटंबना केल्याची घटना आज पहाटे घडली. या घटनेने गावात संतापाची लाट उसळली असून, गाव बंद ठेवत ग्रामस्थांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

पुतळ्याची तोडफोड ही पहाटे साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान झाल्याचे सांगण्यात येत आहे. यवत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

उपाविभागीय पोलिस अधिकारी बापुराव धडस गावकऱ्यांना शांततेचे आवहान करतांना

एकत्रित निषेध आणि शांततेचे आवाहन

हिंदू व मुस्लिम समाजातील नागरिकांनी एकत्र येत निषेध मोर्चा काढला. ग्रामदैवत कालभैरवनाथ मंदिरासमोर निषेध सभा घेण्यात आली. दोन्ही समाजांनी या कृत्याचा निषेध करत आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.

यवतमधील दुकाने, बाजारपेठ, हॉटेल्स पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. गावकऱ्यांनी सांगितले की, “आरोपीस अटक होईपर्यंत गाव बंद राहील आणि पुतळ्याची पुनःप्रतिष्ठा होणार नाही.”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केलेले ठिकाण

पोलीस यंत्रणा अलर्ट

घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांनी गावकऱ्यांना संयम बाळगण्याचे आवाहन करत सांगितले की “अशा विकृतीच्या कृत्याला कधीही पाठीशी घालणार नाही. आरोपीस लवकरच अटक केली जाईल.”