केडगाव प्रतिनिधी | आवाज लोकशाहीचा
वाखारी गावच्या हद्दीत असलेल्या न्यू अंबिका लोकनाट्य कला केंद्रावर २१ जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजता झालेल्या गोळीबार प्रकरणाने दोन दिवस सोशल मीडियावर प्रचंड वादळ उठवले होते. अखेर यवत पोलिसांनी दोन दिवसांच्या तपासानंतर या प्रकरणाचा उलगडा केला असून, यामधून अनेक गंभीर प्रश्नही निर्माण झाले आहेत.
या प्रकरणात कला केंद्राचे मॅनेजर बाबासाहेब अंधारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गणेश जगताप, बाबासाहेब मांडेकर, चंद्रकांत मारणे आणि एक अन्य व्यक्तीने कला केंद्राच्या बैठकी खोलीत गोळीबार केला. या प्रकरणात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे अतिशय गंभीर मानले जात आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून चौफुला, वाखारी आणि देवळगावगाडा येथील सर्व लोकनाट्य केंद्रांमध्ये तपास करण्यात आला होता. रेणुका कला केंद्र चौफुला येथील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी जप्त केले. परंतु, कुठलाही ठोस पुरावा मिळत नव्हता. शेवटी न्यू अंबिका कला केंद्राचे मॅनेजर अंधारे यांची सखोल चौकशी करण्यात आली आणि त्यातून खऱ्या घटनेचा उलगडा झाला.
दोन दिवस प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?
या घटनेची माहिती सुरुवातीला पोलिसांपासून लपवली गेली यावरून नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. कला केंद्राचे पदाधिकारी, कलावंत आणि मॅनेजर यांनी घटना घडल्यावर तातडीने माहिती का दिली नाही, याबद्दल चौफुला वाखारी परिसरात प्रश्न विचारले जात आहेत. घटनास्थळी असलेले इतर कलावंतही गप्प का राहिले?
गोळीबार करणारे कोण? राजकीय आशीर्वाद की गुन्हेगारी पार्श्वभूमी?
तक्रारीत दिलेली नावे समोर आली असली तरी संबंधितांची गावं व ओळख अद्याप गुलदस्त्यात आहेत. हे व्यक्ती कलाविषयक रसिक होते की गुन्हेगारी प्रवृत्तीचे? याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. पोलिसांनी तपासादरम्यान अनेक लोकनाट्य केंद्रांमध्ये वारंवार चौकशी केली तरी माहिती मिळाली नाही, हे संशयास्पद आहे.
लोकनाट्य केंद्रे आणि वाढती असुरक्षितता
या घटनेमुळे लोकनाट्य कलावंत, केंद्रांचे व्यवस्थापक आणि उपस्थित प्रेक्षक यांची सुरक्षितता धोक्यात असल्याचे स्पष्ट होते. रिव्हॉल्वर घेऊन कला केंद्रात येणाऱ्यांना कोणी निमंत्रण दिले? अशा घटनांमुळे कला केंद्रांवरील विश्वास डळमळीत होत असून, हे केंद्र फक्त कला सादरीकरणाचे नव्हे तर इतर अनैतिक व्यवहारांचे केंद्र बनत आहेत का, असा सवाल उपस्थित होतो.
पोलिस तपासावर नागरिकांची अपेक्षा

हा प्रकार फक्त “हवेत गोळीबार” म्हणून नोंदवून विसरून चालणार नाही. उद्या तो गोळीबार कोणावर तरी होऊ शकतो. त्यामुळे हे गुन्हेगार कोण, त्यांचा हेतू काय होता, त्यांचे संबंध कोणाशी आहेत याचा संपूर्ण छडा पोलिसांनी लावावा, अशी नागरिकांची ठाम मागणी आहे.




