–
आवाज लोकशाहीचा
यवत प्रतिनिधी | २० जुलै २०२५
**यवत आणि चौफुला परिसरात विषारी ताडीचा विळखा!
पोलिसांची दुर्लक्षशैली – नागरिक संतप्त**
यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत राजरोसपणे विषारी ताडीची विक्री सुरू असून प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
“झोपडपट्टी सुरक्षा दल, यवत” या स्थानिक संस्थेने १२ जुलै रोजी यवत पोलिसांना तक्रार पत्र दिले असूनही आजतागायत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चौफुला – विषारी ताडीचा ‘हॉटस्पॉट’
चौफुला येथे भेसळयुक्त ताडी विक्रीचे केंद्र खुलेआम सुरू आहे. इंदिरानगर झोपडपट्टी, खुटबाव-नाथाची वाडी रोडवरील मातोबा तलावाजवळ हे प्रकार सर्रास सुरू आहेत.
गोरगरीब कुटुंबांतील तरुणांना या ताडीमुळे व्यसनाधीनता आणि शारीरिक समस्या जडत आहेत, चेहऱ्यावर सूज, अशक्तपणा, हिंसाचार या तक्रारी महिलांनी व्यक्त केल्या आहेत.
पोलीस निष्क्रिय की हातात हात?
तक्रारी असूनही कारवाई का नाही? यवत पोलिसांना विचारले असता “तुम्ही म्हणताय तर बघतो” अशा स्वरूपाचे उपहासात्मक उत्तर मिळत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
असे उत्तर म्हणजे पोलीस खात्याच्या “शब्दरक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रीदवाक्याला उपहास ठरतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
अवैध ताडी विक्रीमागे पोलीस आणि विक्रेत्यांचे साटेलोटे असल्याचा थेट आरोप नागरिक आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. तक्रार करणाऱ्यांनाच पोलिसांकडून लक्ष्य केले जात असल्याचा धक्कादायक अनुभव काही नागरिकांनी शेअर केला आहे.
दौंड-यवत हद्दीतील ढाबे – विषारी दारूचे अड्डे
पुणे-सोलापूर महामार्गावर खडकी, रावणगाव, स्वामीचिंचोळी येथील ढाब्यांवर काचेच्या बाटल्यांमध्ये “कॉटर” नावाने भेसळयुक्त दारू खुलेआम विकली जाते.
हा सर्व व्यापार दौंड आणि यवत पोलीस स्टेशनच्या नाकाखालून सुरू असून वर्षानुवर्षे पोसल्या जाणाऱ्या माया आणि गुप्त संमतीच्या छत्रछायेखाली हा व्यवसाय फोफावत आहे.
“न्याय मागायचा कोणाकडे?” – जनतेचा प्रश्न
तक्रारींची दखल नाही, कारवाई नाही, उलट तक्रारदारच त्रासात!
या गंभीर प्रकारांवर आता पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक प्रशासन जबाबदारी स्वीकारणार का? की भेसळयुक्त ताडीचा हा गोरखधंदा आणखी बळावणार?
जनतेने आता न्याय कोणाकडे मागावा हा प्रश्न निर्माण झाला आहे.



