पंढरपूर : प्रतिनिधी
आवाज लोकशाहीचा
पंढरपूर नगरीत आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-नामाच्या जयघोषात भक्तांनी गर्दी केली आहे. महाराष्ट्रासह देशभरातून आलेल्या लाखो वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरावर हरिपाठ, अभंग आणि भजनाच्या गजरात विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पहाटे शासकीय महापूजा पार पडली. राज्यभरातील शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी प्रार्थना केली.
पंढरपूरात आज सकाळपासूनच दिंड्यांचे आगमन सुरू असून, सुमारे २० लाखांहून अधिक भाविकांनी पंढरपूरात हजेरी लावली आहे. संपूर्ण शहर विठ्ठल नामाच्या गजरात न्हालं आहे. चंद्रभागा नदीवर स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी असून, सुरक्षिततेसाठी प्रशासनाने कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र धर्म’ या नव्या पॉडकास्ट मालिकेची घोषणा करत वारकऱ्यांसोबत संवाद साधला. यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपूरातील मंदिर परिसर, रस्ते, दिंडी मार्ग सजवण्यात आले आहेत. ठिकठिकाणी आरोग्य सुविधा, पाणी, अन्नछत्र व सुरक्षिततेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
पंढरपूर नगरीत आजची ही भक्तिभावाची पर्वणी संपूर्ण महाराष्ट्राला जोडणारी ठरत आहे.




